Eknath Shinde On Raj Thackeray: मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्हावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीका केली होती. शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्हं तुमची प्रॉपर्टी नाहीय. ते बाळासाहेब ठाकरेंचं आहे, असं राज ठाकरेंनी ठणकावलं होतं. यावर आता एकनाथ शिंदेंनी कोल्हापूरमधील भाषणातून प्रतिक्रिया दिली आहे. मात्र त्यांनी राज ठाकरेंचं नाव न घेता उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.
शिवसेना कोणाची आहे हे लोकांनी ठरवलंय. धनुष्यबाण कोणाचं आहे, हे देखील ठरवलं आहे. बाळासाहेबांचं धनुष्यबाण, बाळासाहेबांची शिवसेना गहाण ठेवलेली, जी आम्ही वाचवली नसती तर काँग्रेसने विकून टाकली असती. धनुष्यबाण हे बाळासाहेबांचच आहे, त्यांनीच कमावलं आहे. परंतु आम्ही ते जिवापाड जपलं आहे. त्यासाठी आम्ही सत्ता सोडली, 8-10 मंत्र्यांनी सत्ता सोडली, 50 आमदारांनी सत्ता सोडली, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितले. कोल्हापूरमधील प्रचारसभेत एकनाथ शिंदे बोलत होते.
राज ठाकरे नेमकं काय म्हणाले होते?
बाळासाहेबांच्या नावामागची हिंदुहृदयसम्राट ही उपाधीच उद्धव ठाकरेंनी काढून टाकली- राज ठाकरे
2019 ला तुम्ही ज्यांना मत दिलं ते नक्की कुठे आहे याचा विचार केलात का ? दोन वेगवेगळ्या विचारांचे पक्ष ज्यांच्यातून विस्तव जात नसे ते पक्ष एकत्र आले आणि सत्तेत बसले. लोकांनी मतदान शिवसेना-भाजपला, काँग्रेस-राष्ट्रवादीला केल आणि इकडचा गट तिकडे गेला, तिकडचा गट इकडे आला. वाट्टेल तशा युत्या, आघाड्या झाल्या. आणि यांत काय घडलं तर बाळासाहेबांच्या नावामागची हिंदुहृदयसम्राट ही उपाधीच उद्धव ठाकरेंनी काढून टाकली. वैचारिक व्यभिचार किती करायचा? अडीच वर्षानंतर एकनाथ शिंदे अजित पवारांच्या मांडीला मांडी लावून बसू शकत नाही म्हणत चाळीस आमदार घेऊन बाहेर पडले, मुख्यमंत्री झाले, पुढे वर्षभरात अजित पवारच शिंदेच्या मांडीला मांडी लावून बसले. यातून तुमच्या मताची लायकी काय आहे ते कळलं का?, असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला.