Maharashtra Vidhan Sabha Election 2024: राज्यात 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी पार पडणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर राज्यात सर्वंच राजकीय पक्षांची विविध ठिकाणी जाहीर सभा होत आहेत. याचदरम्यान एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी महायुतीला (Mahayuti) राज्यात किती जागा मिळणार, याबाबत मोठं विधान केलं आहे.
टेलिग्राफ वृत्तपत्राला नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये महायुतीला 170 जागा मिळण्याचा अंदाज एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर खरी शिवसेना ही आमचीच आहे, शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह देखील आमच्याकडे आहे, असं एकनाथ शिंदेंनी सांगितलं. तसेच लोकसभेत सेना विरुद्ध सेना लढतीत 13 पैकी 7 जागा आम्हाला मिळाल्याचा पुनरुच्चार देखील एकनाथ शिंदेंनी यावेळी केला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ 'बटेंगे तो कटेंगे' असे म्हणतात. या प्रश्नावर एकनाथ शिंदे म्हणाले की, आमचा अजेंडा केवळ आणि केवळ विकास आहे. योगी आदित्यनाथ बोलतात याचा अर्थ एक व्हा आणि मतदान करा, त्यात वावगं काही नाही, असं एकनाथ शिंदेंनी सांगितले. (Maharashtra Vidhan Sabha Election 2024)
आयएनएस आणि मॅट्रीझ पोलचं सर्वेक्षणात काय?
आयएनएस आणि मॅट्रीझ पोलच्या सर्वेक्षणातून 47 टक्के मतदान महायुतीच्या पारड्यात पडू शकते. तर, महाविकास आघाडीच्या पारड्यात 41 टक्के मतदान पडेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. इतर पक्षांसाठी केवळ 12 टक्के मतदानाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या सर्वेक्षणातून राज्यातील विभागीय निकालाचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.
राज्यात कोणाला किती जागा मिळणार?
आयएनएस आणि मॅट्रीझ पोलच्या सर्वेक्षणानूसार राज्यातील 288 मतदारसंघांचा विचार केल्यास राज्यात महायुतीचं पारडं जड दिसून येत आहेत. त्यानुसार, राज्यात 145 ते 165 जागांवर भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी महायुतीला विजय मिळू शकेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे, महायुतीचं पारड जड असून महायुतीचच सरकार पुन्हा येऊ शकतं,असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. तर, काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना महाविकास आघाडीला 106 ते 126 जागांवर विजय मिळू शकतो, असा अंदाज या सर्वेक्षणातून वर्तवण्यात आला आहे.
संबंधित बातमी:
नक्षलवादाला लगाम घालत या भागात आम्ही उद्योग आणले; चंद्रपुरात मोदींचं भाषण, काँग्रेस, मविआवर हल्लाबोल