पालघर : पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये 63.72 टक्के मतदान झाल्याची माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिली. मतदानाची वेळ सकाळी 7 ते संध्याकाळी 6 पर्यंत असली तरी पालघर लोकसभा मतदारसंघातील काही मतदान केंद्रांवर रात्री 10:40 वाजेपर्यंत मतदान सुरु होतं. मतदार जास्त आणि मतदान प्रक्रियेची साहित्य, यंत्रणा कमी यामुळे भोंगळ कारभार झाल्याचं समोर आलं. परंतु तब्बल 15 ते 16 तास चाललेल्या निवडणूक प्रक्रियेमुळे पालघर लोकसभेतील निवडणूक प्रक्रियेचे मात्र धिंडवडे उडाले. तर मतदारांचे मात्र हाल झाले. 

या गोंधळामुळे महाराष्ट्रातील सर्व मतदारसंघांची मतदानाची अंतिम टक्केवारी काल (29 एप्रिल) रात्री जाहीर झाली. मात्र पालघर लोकसभा मतदारसंघाची टक्केवारी दुसऱ्या दिवशी म्हणजे आज (30 एप्रिल) दुपारी बारा वाजता जाहीर करण्यात आली. अपुऱ्या यंत्र सामुग्रीमुळे मतदानाला वेळ लागल्याने मतदारांना चार ते पाच तास रांगेत ताटकळत उभं राहावं लागलं. तर या ठिकाणी पिण्यासाठी पाण्याची सोयही नसल्याच्या तक्रारी मतदारांनी केल्या.  

ईव्हीएमचा घोळ, चार तासांपासून मतदार रांगेत, उशिरापर्यंत मतदान चालणार

उशिरा मतदान झालेली केंद्र

270 किरण पाटील शाळा धानीवबाग पूर्व (नालासोपारा)


पेल्हार जिल्हापरिषद शाळा

पालघर विधानसभेतील दोन केंद्र

विक्रमगड विधानसभेतील दोन केंद्र

नालासोपारा पूर्व धानीवबाग आणि पेल्हार गावातील जिल्हा परिषद शाळा येथे रात्री साडे दहा वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरु होती. धानीवबाग येथील किरण पाटील शाळेतील 270 मतदान केंद्रावर रात्री 9 वाजून 16 मिनिटाला तर पेल्हारच्या जिल्हा परिषद शाळेवरील केंद्रात 10 वाजून 35 मिनिटाला शेवटच्या मतदाराने आपल्या मतदानाचा हक्क बजावला.

270 क्रमांकाच्या मतदान केंद्रावर 2494 मतदारांचे मतदान होते, यापैकी 1458 एवढे मतदान झालं. शेवटच्या मतदाराने 9.16 वाजता मतदान केलं. पेल्हार गावातील जिल्हा परिषद  शाळेतील मतदान केंद्रावर एकूण 1652 एवढे मतदार होते. त्यांपैकी 945 जणांनी मतदान केलं आहे. याठिकाणी 10.35 मिनिटाला शेवटच्या मतदाराने मतदान केलं .

पालघरमध्ये किती मतदार?

पालघर मतदारसंघात एकूण 18 लाख 85 हजार 297 मतदार आहेत. यामध्ये 9 लाख 88 हजार 997 पुरूष, 8 लाख 96 हजार 189 महिला आणि 111 तृतीयपंथीयांचा समावेश आहे. त्यापैकी 12 लाख 01 हजार 298 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये 641156 पुरुष (64.83 टक्के), 560118 महिला (62.50 टक्के) आणि 24 तृतीयपंथीयांचा (21.62 टक्के) समावेश होता. या निवडणुकीच्या रिंगणात 12 उमेदवार होते.

विधानसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे 

डहाणू - 67.13 टक्के

विक्रमगड - 69.50 टक्के

पालघर - 68.57 टक्के

बोईसर - 68.49 टक्के

नालासोपारा - 52.16 टक्के

वसई- 65.24 टक्के.

जिल्ह्यातील सर्व मतदान यंत्रे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यामार्फत पालघर इथल्या स्ट्रॉंग रुममध्ये कडेकोट पोलिस बंदोबस्तात सुरक्षित ठेवण्यात आला होता. 23 मे रोजी सकाळी 8 वाजता गोडाऊन क्र. 2, सूर्या कॉलनी इथे मतमोजणी होईल.