पुणे : अभिनेता सुभाष यादवकडून खंडणी उकळल्याप्रकरणी एका मराठी चित्रपट अभिनेत्रीला लातूरमध्ये बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. पुणे गुन्हे शाखेने शनिवारी ही कारवाई केली. संबंधित चित्रपट अभिनेत्री ही आपली सहअभिनेत्री आणि दहशतवाद विरोधी पथकामधील उपनिरीक्षकाच्या साथीने खंडणीखोरी करत असल्याचा आरोप आहे. याप्रकरणी एकूण दोघांना अटक झाली आहे.


सुभाष यादवने गैरवर्तन केल्याचा आरोप अभिनेत्री रोहिणी मच्छिंद्र माने हिने गेल्या वर्षी केला होता. त्यानंतर पुण्यातील वानवडी पोलिसांनी सुभाषला बेड्याही ठोकल्या होत्या. हे प्रकरण मिटवण्यासाठी रोहिणी माने हिने सुभाष यादवकडे खंडणी मागितल्याचा आरोप आहे. याप्रकरणी राम भरत जगदाळे आणि रोहिणी माने हिला अटक करण्यात आली आहे. तर  पोलिस उपनिरीक्षक अमोल टेकाळे आणि सारा श्रावण अद्याप फरार आहेत.


दहशतवाद विरोधी पथकातील उपनिरीक्षक अमोल टेकाळे अभिनेत्रीला मदत करत असल्याची माहिती पुणे क्राईम ब्रांचला मिळाली. त्यानंतर टेकाळेला अटक करण्यासाठी पुणे क्राईम ब्रांचचं पथक लातूरला गेलं होतं, मात्र त्याने घटनास्थळावरुन पोबारा केला. त्याठिकाणी पोलिसांना आरोपी अभिनेत्रीचा ठावठिकाणा लागला. तिला अटक करुन पोलिस पुण्याला आले, तर टेकाळेला निलंबित करण्यात आलं. 'पुणे मिरर' वृत्तपत्राने यासंदर्भात बातमी दिली आहे.


अभिनेत्रीशी गैरवर्तन करणाऱ्या अभिनेत्याला बेड्या


सुभाष यादवला लैंगिक गैरवर्तन प्रकरणात अटक झाल्यानंतर आरोपी अभिनेत्री, सुभाष यादव आणि त्यांचे कुटुंबीय अशी बैठक घेण्यात आली होती. अभिनेत्रीने आपल्याकडे पैसे मागितल्याचा आरोप त्यावेळी सुभाषने केला होता.


सुभाष तक्रार मागे घेण्यासाठी आपल्यावर दबाव आणत आहे, असा दावा अभिनेत्रीने डिसेंबर महिन्यात पुणे पोलिस आयुक्तांना पत्र लिहून केला होता. सोशल मीडियावरुन तक्रारदार अभिनेत्रीची प्रतिमा मलीन केल्याचा आरोप सुभाष यादववर आहे.


दोन वर्षांपासून एका मराठी चित्रपटाचं राज्यात विविध ठिकाणी शूटिंग सुरु आहे. सुभाष यादवने आपल्याशी लगट करण्याच्या उद्देशाने अनेकदा फोन केला. त्याला कुठलाही प्रतिसाद न दिल्यामुळे त्याने बदनामी करण्याची धमकी दिली. पुण्यातील वानवडी पोलिस ठाण्याच्या लेडीज वॉशरुममध्ये त्याने पुन्हा आपल्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप अभिनेत्रीने केला होता.