मुंबई : प्रसिद्ध अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवसेनेला रामराम ठोकला आहे. अजित पवार, छगन भुजबळ, जयंत पाटील आणि धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत कोल्हेंनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर ही मोठी राजकीय घडामोड मानली जात आहे.
'अनेकांना हा प्रश्न पडला असेल, की मी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश का केला? शरद पवार यांचे हात बळकट करण्यासाठी, मराठी माणसाला बळ देण्यासाठी मी पक्षप्रवेश केला. अजित दादांनी मला कायम मार्गदर्शन केलं. या पक्षात प्रवेश करताना खरोखरच आनंद होत आहे. लहानपाणी ज्या पवार साहेबांची छबी पाहण्यासाठी पळत होतो, त्यांच्याच पक्षात प्रवेश करतोय' अशा भावना डॉ. अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करताना व्यक्त केल्या.
'तरुणांना विधायक वाटेची गरज आहे असे वाटतं. ही जाणीव फक्त शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये आहे. देशपातळीवरची दिशा बदलत आहे आणि यामध्ये माझा खारीचा वाटा असावा, म्हणून मी आज हा निर्णय घेत आहे' असंही डॉ. अमोल कोल्हे म्हणाले.
शिरुर लोकसभा मतदारसंघात अमोल कोल्हे राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडणूक लढवण्याची चिन्हं आहेत. तसं झाल्यास शिवसेनेचे विद्यमान खासदार आढळराव पाटलांना जोरदार टक्कर मिळेल.
डॉ. अमोल कोल्हे यांच्याबरोबर बदनापूरचे माजी आमदार अरविंद चव्हाण, किशोर प्रकाश पाटील, नंदुरबार जिल्ह्यातील भाजपचे यश मिलिंद पाटील, महाराष्ट्र भाजपच्या डॉक्टर सेलचे उपाध्यक्ष हर्षल यशवंत पवार यांनी आज राष्ट्रवादी काँगेसमध्ये प्रवेश केला.
काही दिवसांपूर्वीच अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर कोल्हेंच्या पक्षांतराच्या चर्चांना उधाण आलं होतं.
डॉ. अमोल कोल्हेंचा राजकीय प्रवास
डॉ. अमोल कोल्हे यांनी साकारलेली छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका प्रचंड गाजली होती. त्यानंतर कोल्हेंच्या लोकप्रियतेचा फायदा घेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी त्यांच्या हाती शिवबंधन बांधलं होतं. 19 मार्च 2014 रोजी कोल्हेंनी शिवसेनेचा भगवा हाती धरला होता. प्रत्यक्षात त्यावेळी ते मनसेत प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात होती.
2014 मधील विधानसभा निवडणुकांच्या वेळी कोल्हे शिवसेनेचे स्टार प्रचारक होते. डॉ. अमोल कोल्हेंच्या वक्तृत्वशैलीमुळे श्रोते त्यांच्या भाषणांना आवर्जून उपस्थित राहत. मात्र पुणे महापालिका निवडणुकांच्या वेळी कोल्हेंची जादू फारशी चालली नाही.
अमोल कोल्हे यांनी 2015 पासून शिवसेनेच्या पुणे आणि पिंपरी चिंचवड विभागाचं संपर्कप्रमुख पद सांभाळलं होतं. त्यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत शिवसेनेची झालेली पिछेहाट पाहून या पराभवाची नैतिक जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती.
'आदरणीय उद्धवसाहेब, आपण माझ्यावर विश्वास दाखवून फार मोठी जबाबदारी सोपवली होती. वेळोवेळी आपण माझ्या पाठीशी खंबीरपणे उभेही राहिलात. परंतु आपला विश्वास सार्थ ठरवण्यात मी अपयशी ठरलो. इतर कोणालाही दोष न देता मी या पराभवाची जबाबदारी स्वीकारतो' असं पत्र फेब्रुवारी 2017 मध्ये कोल्हेंनी लिहिलं होतं.
डॉ. अमोल कोल्हे यांनी अनेक मालिका, चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. मात्र स्टार प्रवाह वाहिनीवरील राजा शिवछत्रपती मालिकेतील शिवरायांच्या भूमिकेमुळे ते नावारुपाला आले. कलर्स वाहिनीवर वीर शिवाजी ही त्यांची हिंदी मालिकाही गाजली होती. छत्रपती संभाजी राजे मालिकेत सध्या डॉ. कोल्हे हे शंभूराजेंची भूमिका साकारत आहेत.
शरद पवारांचे हात बळकट करणार, डॉ. अमोल कोल्हेंचा राष्ट्रवादीत प्रवेश
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Mar 2019 04:15 PM (IST)
'तरुणांना विधायक वाटेची गरज आहे असे वाटतं. ही जाणीव फक्त शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये आहे. देशपातळीवरची दिशा बदलत आहे आणि यामध्ये माझा खारीचा वाटा असावा, म्हणून मी आज हा निर्णय घेत आहे' अशा भावना डॉ. अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करताना व्यक्त केल्या.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -