अमरावती : नितीन गडकरीजी तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगा की, शरद पवारांना भाजपत घेऊ नका, त्यांना तिथेच राहु द्या, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय भूपृष्ट वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. उद्धव म्हणाले की, किमान त्यांना तरी तिथेच राहु द्या, नाहीतर आपण काय करायचं, दाणपट्टा घरातच फिरवायचा का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी गडकरींना विचारला आहे. आज यवतमाळमध्ये महायुतीची महामेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात उद्धव बोलत होते.
उद्धव ठाकरे म्हणाले की, "सध्या कोणावर टीका करायची तेच कळत नाही, अनेकदा टीका करताना पंचाईत होते. आज कोणत्यातरी पक्षात असलेला नेता उद्या शिवसेना किंवा भाजपमध्ये असायचा. त्यामुळे आता माझी एकच विनंती आहे, की आता शरद पवारांना तेवढं भाजपमध्ये घेऊ नका''
"पाकिस्तानमध्ये क्रिकेट खेळाडू पंतप्रधान झाला आणि इथे पंतप्रधानपदाचे स्वप्न पाहणारे क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष झाले", असे बोलून उद्धव यांनी शरद पवारांना चिमटा काढला आहे.
उद्धव यांनी आज काँग्रेस आणि राष्ट्रवादीला लक्ष्य केले, ते म्हणाले की, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आम्हाला देश म्हणजे काय हे विचारु नये, आम्ही 55 वर्ष तुम्हाला पाहून काय शिकू नये हे बघितले आहे.
शरद पवारांना भाजपत घेऊ नका : उद्धव ठाकरे
एबीपी माझा वेब टीम Updated at: 15 Mar 2019 11:59 PM (IST)