वर्धा : निवडणूक असल्यानं सर्वत्र वाहनांची तपासणी केली जात आहे. यात व्हीआयपींनाही तपासलं जातं आहे. पण, प्रत्येक व्हीआयपी आणि खासकरुन राजकीय पुढाऱ्यांना ही तपासणी सहन होईलच असं नाही. असाच किस्सा परिवहन मंत्री दिवाकर रावतेंसोबत घडला आहे. रावते यांचं वाहन वर्ध्याच्या पुलगाव इथं तपासले गेलं आणि रावते यांनी कर्तव्यावर असलेल्या कर्मचार्‍यांवर आगपाखड केली.


परिवहन मंत्री आणि शिवेसना नेते दिवाकर रावते वर्ध्यातील पुलगाव इथं सभेकरता आले होते. निवडणुकीचा कालावधी असल्यानं पुलगाव इथं स्थिर तपासणी पथकानं इतर वाहनांप्रमाणेच रावतेंच्या वाहनाचीही तपासणी केली. यावेळी वाहन आणि वाहनाची डिक्कीही तपासली आणि रावते यांचा पारा चढला. रावतेंनी निवडणूक कालावधीत सगळे समान असल्याची भावना विसरून स्वत:ची ओळख दर्शविण्याचा प्रयत्न केल्याचं सांगितलं जातं आहे.

यावेळी कॅमेरामनसह उपस्थितांना रावते यांनी मी कोण आहे तुम्हाला माहित नाही काय? असं सांगत काही वेळ कर्मचाऱ्यांशी वाद घातला. काहींनी हा प्रकार मोबाईलमध्ये कैद करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना मोबाईलमधील रेकॉर्डिंग डिलीट करायला लावलं गेल्याचं देखील सांगितलं जातं आहे.

ही बाब निवडणूक निर्णय अधिकार्‍यांसोबतच वरिष्ठांना आणि पोलिसांनाही कळविण्यात आली. निवडणूक अधिकार्‍यांनी मात्र कणखर भूमिका घेत तपासणी केल्यानंतरच वाहन सोडलं. पोलिसांनी त्यांच्याकडं या घटनेची नोंद घेतल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. देवळीच्या निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी हा प्रकार गैरसमजातून घडल्याचं कारण सांगितलं आहे.