पिंपरी चिंचवड : मावळ लोकसभेत भाजप-शिवसेना युतीत अखेर मनोमिलन झालं आहे. गेली दहा वर्षे एकमेकांचं तोंड न पाहणारे शिवसेना उमेदवार श्रीरंग बारणे आणि भाजप आमदार लक्ष्मण जगताप चक्क एकाच गाडीतून आले. यानंतर बारणे-जगताप यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेत वादावर पडदा टाकला.


मुख्यमंत्र्यांचे दूत म्हणून मंत्री गिरीश महाजन यांनी हे मिलन घडवलं. रविवारी (7 एप्रिल) रात्री महाजन आणि पालकमंत्री गिरीश बापट यांनी बारणे आणि जगताप यांच्यासमवेत चर्चा केली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी दोघांचं फोनवरुन बोलणं झालं. त्यानंतर त्यांचं मनोमिलन घडलं.

स्वतः श्रीरंग बारणे लक्ष्मण जगताप यांच्या घरी गेले. नंतर शिवसेना खासदार संजय राऊत, मंत्री गिरीश महाजन यांनी दोघांच्या बैठका घेतल्या होत्या. पण जगतापांची नाराजी दूर होत नव्हती. अखेर मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे या दोघांनाच यात लक्ष घालावं लागलं. दोघांशी बोलणं होताच जगतापांनी वैर मागे टाकले आणि पत्रकार परिषद घेत तशी घोषणा केली.

पत्रकार परिषदेला तर बारणे-जगताप एकाच गाडीतून आल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या. नंतर तर हातात हात घेऊन पत्रकारांसमोर आले, अन् सर्वच अचंबित झाले. आजवर केलेले सर्व आरोप मागे घेत, हे केवळ राजकीय वितुष्ट होते, असं बारणे म्हणाले. तर राजकारणात मतभेद असावेत, मनभेद नाही, याच तत्वावर आम्ही एकत्र आलो आहे. पक्ष महत्त्वाचा आहे. नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करायचे आहे. त्यामुळेच आमचे स्वार्थ आम्ही बाजूला ठेवले आहेत, असं जगताप यांनी स्पष्ट केलं.

दोघांनी एकमेकांना पेढा भरवत पत्रकार परिषदेचा समारोप केला. विजयात अडसर ठरणाऱ्या लक्ष्मण जगताप यांची नाराजी दूर झाल्याने श्रीरंग बारणेंच्या जीवात जीव आला आहे.