धुळे : अनिल गोटे यांच्या लोकसंग्राम पक्षाला अपेक्षित यश मिळालं नसलं, तरी त्यांच्या पत्नी हेमा गोटे विजयी झाल्या आहेत. लोकसंग्रामच्या उमेदवारांपैकी एकमेव हेमा गोटे यांनी विजय मिळवला. भाजपच्या उमेदवाराला त्यांनी चारी मुंड्या चित केलं.


हेमा गोटे धुळे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 5 ब मधून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. अनिल गोटे यांचे विरोधक असलेल्या मनोज मोरे यांच्या पत्नी भारती मोरे भाजपतर्फे त्यांच्याविरोधात मैदानात होत्या.

अनिल गोटे यांनी पत्नी हेमा गोटे यांना लोकसंग्राम पक्षाकडून धुळ्याच्या महापौरपदाची उमेदवार घोषित केली होती. मात्र लोकसंग्राम जिल्ह्यात फारशी चमक दाखवू शकला नाही. अनिल गोटे यांचे पुत्र तेजस गोटे यांनाही पराभवाचा धक्का सहन करावा लागला.

दरम्यान, धुळ्यातील भाजपच्या विजयानंतर मंत्री गिरीश महाजन आणि अनिल गोटे यांच्यामध्ये खडाजंगी झाली. भाजपने ईव्हीएममध्ये घोटाळे करुन विजय मिळवल्याचा आरोप अनिल गोटे यांनी केला आहे. भाजप गुंडांचा पक्ष असून बाहेरुन आणलेल्या गुंडांना पक्षात प्रवेश दिला जात असल्याचा घणाघातही त्यांनी केला.

मतदानाच्या दिवशीच अनिल गोटे यांच्या गाडीवर दगडफेक झाली होती. विरोधकांनी आपल्या हत्येचा कट रचल्याचा आरोप यावेळी अनिल गोटेंनी केला. मात्र गोटेंना स्टंटबाजीची जुनी खोड असल्याचा प्रतिहल्ला भाजप खासदार सुभाष भामरेंनी केला.

नाराज अनिल गोटेंनी गेल्या महिन्यात राजीनामा देण्याची घोषणा केली होती. मात्र मुख्यमंत्र्यांनी चर्चा करुन त्यांना थोपवून धरलं. त्यानंतर पक्षाने फसवणूक केल्याचा दावा करत गोटे यांनी राजीनामा दिला आणि नव्या पक्षाची घोषणा केली.