धुळे : महाराष्ट्रातील 29 महापालिकांच्या मतदानाला काही तास बाकी असताना राज्यातील विविध भागात वाद झाल्याचे समोर आले आहे. उत्तर महाराष्ट्रातील धुळे महानगरपालिकेच्या मतदानापूर्वीच धुळ्यात मोठी घटना घडली आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनोज मोरे यांच्या घरावर दगडफेक झाली आहे. या घटनेत मनोज मोरे यांच्या घराचं आणि घरातील साहित्याचं मोठं नुकसान झालंय.  

Continues below advertisement

धुळे महानगरपालिकेच्या  मतदानाच्या पूर्वसंध्येला शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख मनोज मोरे यांच्या घरावर दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत खुर्च्यांचे देखील नुकसान करण्यात आले आहे. घराच्या खिडकीच्या काचा देखील तुटल्या असून विटांचा खच देखील पडल्याचे पाहायला मिळत आहे. प्रभाग क्रमांक 200 भाजपाचे उमेदवार विलास शिंदे यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी हा हल्ला केल्याचा आरोप जिल्हाप्रमुख मनोज मोरे यांनी केला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून याप्रकरणी देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

मनोज मोरे काय म्हणाले?

आम्ही निवडणुकीच्या कामात होतो, घरी कोणीही नव्हतं, निवडणुकीत काय सुरु आहे याची माहिती मंजुळा गावित यांना माहिती देण्यासाठी गेलो होतो, त्यावेळी मुलीचा फोन आला आणि तिनं भाजपच्या विलास शिंदे यांच्या समर्थकांनी दगडफेक केल्याचा आरोप मनोज मोरे यांनी केला आहे. भाजपचे गुंड उमेदवारांच्या घरात दहशत निर्माण करण्यासाठी दगडफेक करुन गेले आहोत. भाजपच्या हातात सत्ता दिली तर गुंडगिरी वाढेल, असं मनोज मोरे म्हणाले. भाजपनं दिलेले उमेदवार गुंडगिरी प्रवृत्तीचे आहेत. भाजपला मतदान केल्यास धुळ्यातील गुंडगिरी संपण्याऐवजी वाढणार आहे, असं मनोज मोरे यांनी म्हटलं. 

Continues below advertisement

धुळ्यात 70 जागांसाठी मतदान

धुळे महानगरपालिकेची सदस्यसंख्या 74 इतकी आहे. धुळ्यात भाजपनं चार जागा बिनविरोध निवडून आणण्यात यश मिळवलं आहे. त्यामुळं 70 पैकी चार जागांवर मतदान होणार आहे. धुळे महापालिका निवडणुकीसाठी आता 316 उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये भाजपचे 58,   राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट 40,  शिवसेना शिंदे गट 29,  काँग्रेस 21,  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 29,  राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट 19 , मनसे 4, एम आय एम 21 , समाजवादी पक्ष 7,  बहुजन समाज पक्ष 5,  वंचित बहुजन आघाडी 3 आणि 71 अपक्ष रिंगणात आहेत, तर जनता दल सेक्युलरचा 01 उमेदवार रिंगणात आहे. 

दरम्यान, धुळे महापालिका निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झालं आहे. या निवडणुकीत मतदार कौल कोणाला देतात हे पाहावं लागेल.