Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 मुंबई: विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यापासून सर्वांच्याच मनात असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर अखेर मिळताना दिसतंय. कारण महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री होणार हे आता स्पष्ट झालंय. मुख्यमंत्रिपदाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) जो काही निर्णय घेतील तो शिवसेनेला मान्य असेल, असं एकनाथ शिंदेंनी काल पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलं. दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून मौन बाळगून असलेल्या एकनाथ शिंदेंनी पत्रकार परिषद घेत अनेक अनुत्तरीत प्रश्नांना पूर्णविराम दिलाय. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार, याबाबत सस्पेन्स वाढत असताना देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या ट्विटची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.
महाराष्ट्रातील मुख्यमंत्रिपदाची चर्चा रंगली असताना देवेंद्र फडणवीसांनी एक एक्सवर (आधीचे ट्विटर) एक पोस्ट केली आहे. यामध्ये महत्वाकांक्षी रेल्वे प्रकल्पांमुळे महाराष्ट्राच्या प्रगतीला नवा वेग मिळाल्याचं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वात मंत्रिमंडळाने महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश या राज्यांतील रेल्वेच्या अंदाजे एकूण 7,927 कोटींच्या 3 महत्त्वाच्या प्रकल्पांना मंजुरी दिली आहे.पीएम-गती शक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅन अंतर्गत येणाऱ्या या प्रकल्पांमुळे विकासाला चालना मिळणार असून प्रवास अधिक सोयीस्कर होईल. तसेच रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होतील आणि तीर्थक्षेत्र यात्रेकरूंना याचा लाभ होईल. महाराष्ट्राच्या विकासाला अधिक गती दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार, असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे.
आज दिल्लीत फडणवीस, शिंदे, पवारांची अमित शाह यांच्यासोबत बैठक-
सत्तास्थापनेत शिवसेनेकडून कोणतीही आडकाठी नसेल असा निरोप एकनाथ शिंदेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना फोनवरून कळवला आहे. आज दिल्लीत अमित शाहांच्या उपस्थितीत देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची बैठक होणार आहे. या बैठकीत सत्तास्थापनेसंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला जाईल.
देवेंद्र फडणवीसांचे मुख्यमंत्री म्हणून झळकले बॅनर-
एकीकडे राज्याचे मुख्यमंत्री कोण होणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले असताना देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय सागर बंगला या निवासस्थानबाहेर सदैव मुख्यमंत्री म्हणून बॅनर झळकले आहेत. मी देवंद्र सरिता गंगाधर फडणवीस महाराष्ट्र राज्याचे सदैव मुख्यमंत्री भावी वाटचालीस अश्या शुभेच्छा देण्यात आल्यात आहेत.