Devendra Fadnavis पुणे : पवार साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांनी आपला पराभव स्वीकारला पाहिजे. पवार साहेबांना जनतेचे मत स्वीकारले पाहिजे. लोकशाही प्रक्रियेवरून लोकांचा विश्वास उठेल, अशा प्रकारची कारवाई किमान शरद पवारांनी करू नये. किंबहुना शरद पवार यांनी जनतेचे ऐकावे, कार्यकर्त्यांचे आणि त्यातल्या त्यात खोटं सांगणार्या कार्यकर्त्यांचे ऐकु नये, असा सल्ला देत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांवर टीका केली आहे. पुण्यातील शिरूर येथे विवाह सोहळ्यासाठी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आले असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
पवार साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांना 50 वर्षापेक्षा जास्त असा प्रदीर्घ अनुभव असलेले ते नेते आहेत. आशा परिस्थितीमध्ये संयमाने वागायचे असते आणि पराभव स्वीकारायचा असतो. त्यांचे जवळचे कार्यकर्ते त्यांच्या दबावाखाली असे वागत असतील पण, मनातून त्यांना माहिती आहे कि आपला पराभव का झाला असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
पवारांचे फडणवीसांना चोख प्रत्युत्तर
शरद पवार पुढे म्हणाले की, काल मुख्यमंत्र्यांनी मला सल्ला दिला. त्यांनी म्हटलं की, पवार साहेबांनी हे करणे योग्य नाही. मी काय चुकीची गोष्ट केली? तुमच्या गावी येणे चुकीचे आहे का? तुमचं म्हणणं ऐकून घेणं चुकीचं आहे का? काही पद्धतीबाबत लोकांच्या मनात शंका आली त्या शंकेची माहिती घेऊन त्याचे निरसन करून त्याच्याबद्दल काळजी घेणं हे काही चुकीचा आहे का? लोकशाही कशासाठी आहे? लोकांचे अधिकार जतन करण्यात अडथळे येत असतील तर लोकप्रतिनिधीने त्याच्या विरोधात आवाज उठवला पाहिजे. मी मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की, आम्हाला इथे राजकारण आणायचे नाही. तिथे जे घडलंय तिथल्या लोकांच्या मनात जी शंका आहे त्या संख्येचे निरसन करायचा आहे. असं कुठेच होऊ नये जेणेकरून निवडणूक यंत्रणेबाबत गैरविश्वास जनतेच्या मनात निर्माण होईल, असे शरद पवार यांनी म्हटले.
शरद पवार नेमकं काय म्हणाले?
"शरद पवार गटाची विधानसभा निवडणुकीतील मतं 72 लाख आहेत. मात्र, आमचे उमेदवार 10 निवडून आलेत. अजित पवारांचे 58 लाख मतं आहेत, त्यांचे 41 उमेदवार निवडून आले आहेत. 80 लाख मत मिळालेल्या पक्षाचे 15 तर 79 लाख मतं मिळालेल्या पक्षाचे 57 आमदार निवडून येतात. असं कॅलक्यूलेशन आहे, आम्ही याच्या खोलात गेलेलो नाही. जोपर्यंत आमच्याकडे आधार नाही, तोपर्यंत याच्यावर भाष्य करणं योग्य नाही. मात्र, मतांचे आकडे आश्चर्यकारक आहेत", असं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले. ते कोल्हापुरातील पत्रकार परिषदेत बोलत होते.
आणखी वाचा