Devendra Fadnavis: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी तासगावमधील सभेत बोलताना सिंचन घोटाळ्याच्या आरोपाबद्दल भाष्य केलं. आर. आर. पाटील यांनी माझा केसाने गळा कापला होता,असा गंभीर आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला, त्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आज एबीपी माझाच्या 'माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन' या कार्यक्रमामध्ये भाष्य केलं आहे. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, स्वर्गीय आर.आर. पाटील हयातीत नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर काही बोलणं हे मला प्रशस्त वाटतं नाही. पण एक सांगतो, जी पहिली चौकशी सुरू झाली ती तेव्हाच काँग्रेस- राष्ट्रवादी यांचं जे आघाडी सरकार होतं. त्या सरकारच्या काळामध्ये सुरू झालेली आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत. 


पुढे फडणवीस म्हणाले, अजित पवारांच्या बाबत होतं. त्याला कट रचला म्हणायचं की दुसरं काय म्हणायचं याबाबत मी काही बोलणार नाही. पण मी इतकंच सांगेन की, अजित पवार यांच्याबाबत जे चौकशीचे आदेश सुरू झाले, ते त्या काळात सुरू झालेले आहेत, ते तुम्ही माहितीच्या अधिकारात मागवू शकता. त्यामध्ये दिसेल तुम्हाला सर्व माहिती. आता आबा आपल्यासोबत नाहीत. आबा आमचे मित्र होते. त्यामुळे जे आपल्यात नाहीत, जे स्व:ताला डिफेंड करू शकत नाहीत, त्यांच्याबद्दल बोलणं योग्य नाही, असंही पुढे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.


काय म्हणाले होते अजित पवार?


70 हजार कोटी रुपयांचे घोटाळ्याचे आरोप झाल्यानंतर कारवाई करण्यासाठी फाईल गृह मंत्रालयाकडे गेली होती. त्यावेळी गृहमंत्री असणारे आर. आर. पाटील यांनी माझी खुली चौकशी करावी असे सांगत फाईलवर सही केली होती. त्यानंतर सरकार गेलं. राष्ट्रपती राजवट लागू झालं. परंतु माझ्या त्या फाईलवर सहीवर राज्यपालांनी सही केली नाही. सरकार बदललं 2014 साली देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. आणि त्यांनी मुख्यमंत्री म्हणून कारवाई करण्यासाठी माझ्या फाईलवर सही केली.  


देवेंद्र फडणवीस याही त्यांच्या बंगल्यावर बोलवून आर. आर. पाटील यांनीच तुमची खुली चौकशी करावी असे आदेश देत सही केल्याचे दाखवलं. ज्याच्यावर एवढा विश्वास ठेवला. एवढं सहकार्य केलं. त्यात आर. आर. पाटील यांनी माझा केसाने गळा कापला होता, असा गंभीर आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला होता. 


नवाब मलिकांबाबत आम्ही स्पष्टपणे सांगितलं होतं- देवेंद्र फडणवीस


महायुतीमध्ये सहभागी असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नवाब मलिक यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा एबी फॉर्म दिल्यानं विरोधकांकडून भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला जात आहे. यावर देखील देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. आम्ही नवाब मलिकांचा प्रचार करणार नाही. नवाब मलिक यांना तिकीट देऊ नका, हे आम्ही अजित पवारांना सांगितलं होतं. मात्र अजित पवारांनी त्यांना एबी फॉर्म दिला. अजित पवारांनी असं का केलं, हे तेच सांगू शकतात, त्यांना विचारा, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.


बाळासाहेबांनी दिलेलं हिंदुत्व उद्धव ठाकरे यांनी कधीच हरवलं- देवेंद्र फडणवीस


आमच्या हिंदुत्वाबद्दल बोलायची गरज नाही. स्वर्गीय बाळासाहेबांनी दिलेलं हिंदुत्व उद्धव ठाकरे यांनी कधीच हरवलं. आदित्य ना हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही बरोबर आहे, कारण त्यांना शिकवण्यासाठी अबू आझमी आहेत. बाळासाहेबांना जनाब म्हटलं जातं, जे हिंदुत्व बाळासाहेबांचे होते, शिवसेनेचे होते ते हिंदुत्व  उद्धव ठाकरेंनी संपवलं, अशी टीका देवेंद्र फडणवीसांनी केली. तसेच ना मला ठाकरे संपवू शकतात, ना मी त्यांना संपवू शकत. कोणाला संपवायचं हे जनता ठरवते, असंही देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.