मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेला पत्र लिहिलं आहे. या पत्राच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांनी जनतेचे आभार मानले आहेत. महाराष्ट्रातील जनतेनं दाखवलेल्या विश्वासाबद्दल आणि दिलेल्या प्रेमाबद्दल त्यांच्या समोर नतमस्तक होतो, असं त्यांनी म्हटलं. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात भाजपनं महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत 149 जागा लढवल्या त्यापैकी त्यांचे 132 उमेदवार विजयी झाले. तर, महायुतीला एकूण 236 जागा मिळाल्या आहेत. या यशाबद्दल पत्र लिहून देवेंद्र फडणवीस यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.
देवेंद्र फडणवीस यांचं पत्र जसंच्या तसं
प्रिय बंधु-भगिनींनो,
सप्रेम नमस्कार,
महाराष्ट्र विधानसभा 2024 च्या निवडणुकीत महायुतीला मिळालेला महाविजय फक्त भाजपा-महायुतीचा नाही, तर महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाच्या विश्वासाचा आहे. तुम्ही दाखवलेल्या या विश्वासासाठी आणि दिलेल्या प्रेमाबद्दल महाराष्ट्राच्या जनतेपुढे मी नतमस्तक होतो.
मेहनत, एकजूटता, लाडक्या बहिणींचे आशीर्वाद आणि मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्त्वावर महाराष्ट्राच्या तमाम जनतेने दाखविलेला विश्वास या विजयाचे खरे शिल्पकार आहेत. महायुतीतील सर्व घटक पक्षांचे नेते, पदाधिकारी, मित्रमंडळी आणि माझा प्रत्येक समर्पित कार्यकर्ता ज्यांनी गेले काही दिवस जिवाचे रान करून वेळ-काळ न पाहता मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला, अश्या सर्वांचा मी कायम ऋणी राहीन!
आपणा सर्वांच्या पाठिंब्यामुळेच महायुतीला मिळालेल्या या विजयाने एक नवीन दिशा दिली आहे. हे यश आपल्या महाराष्ट्राला एक प्रगतीशील आणि सर्वसमावेशक भवितव्यासोबत मा. मोदीजींच्या नेतृत्वात विकसित भारतासह विकसित महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रेरणा देत राहील.
पुन्हा एकदा आपले मनःपूर्वक आभार. आपला विश्वास आणि प्रेम सदैव राहो. हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
आपलाच,
देवेंद्र फडणवीस
इतर बातम्या :
देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत, भाजप आमदार विजयकुमार देशमुखांनी व्यक्त केली इच्छा