पुणे: राज्यात विधानसभा निवडणुका पार पडल्या. त्यामध्ये महायुतीने मोठं यश मिळवलं. त्यानंतर आता महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. महायुतीमध्ये मुख्यमंत्री पद हे देवेंद्र फडणवीसांकडे जाणार असल्याच्या चर्चा आहेत. अद्यात दिल्लीतील पक्षश्रेष्ठींकडून त्याबाबतचं कोणतंही जाहीर वक्तव्य आलं नसलं तरीदेखील मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार म्हणून फडणवीसांकडे पाहिलं जातं आहे, अशातच आता मुख्यमंत्री पदावरून नाराजीनाट्य देखील सुरू असल्याच्या अनेक चर्चा आहेत. तर आपला नेते मुख्यमंत्री व्हावा यासाठी पक्षातील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्तेआग्रही असल्याचं चित्र आहे. राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस बसावेत यासाठी आता भाजपकडून सुद्धा देव पाण्यात ठेवण्यात येत आहेत.


पुण्यात देवेंद्र फडवणीस मुख्यमंत्री व्हावेत यासाठी भाजप कार्यकर्त्यांकडून सारसबाग गणपतीला होम हवन आणि आरती करण्यात आली आहे. मंत्री चंद्रकांत पाटील शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्यासह कार्यकर्त्यांकडून गणपती बाप्पाची आरती करण्यात आली. राज्यात महायुतीमध्ये सरकारमध्ये देवेंद्र फडवणीस हेच मुख्यमंत्री व्हावेत यासाठी कार्यकर्त्यांकडून प्रार्थना करण्यात आली आहे. "पुन्हा या पुन्हा या देवेंद्रजी पुन्हा या" असं म्हणत भाजप कार्यकर्त्यांकडून पुण्यात होम हवन करण्यात आलं आहे. कोथरूडचे नवनिर्वाचित आमदार चंद्रकांत पाटील देखील होम हवनला उपस्थित होते. 


फडणवीस मुख्यमंत्री होण्यासाठी गणरायाला घातलं साकडं


महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीसच व्हावेत यासाठी अखिल भारतीय बंजारा क्रांती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रावण चव्हाण यांनी कार्यकर्त्यांसह अष्टविनायक गणपती मंदिरावर देवेंद्र फडणवीस यांच्या वजना एवढा प्रसाद अर्पण करण्याचे नवस घेऊन साकडे घातले आहेत. राज्यभरातून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत यासाठी देव पाण्यात ठेवले आहेत, नवस, पूजा केली जात आहे. लवकरच मुख्यमंत्री पदाबाबतचं चित्र स्पष्ट होईल. 


"आयोध्या वासियोंकी है पुकार एकनाथ शिंदेजी बने मुख्यमंत्री फिर एकबार"


मुख्यमंत्रीपदासाठी तिन्ही पक्षातून रस्सीखेच सुरू असताना आणि देवाकडे प्राथना केली जात असतानाच आता आपला लाडका नेता मुख्यमंत्री व्हावा असे बॅनर देखील आतात ठिक-ठिकाणी निदर्शनास येत आहेत. काळजी वाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच पून्हा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत म्हणून यूपीच्या आयोध्येत बॅनरबाजी करण्यात आली आहे. "आयोध्या वासियोंकी है पुकार एकनाथ शिंदेजी बने मुख्यमंत्री फिर एकबार" अशा आशयाचे बॅनर आता अयोध्येत देखील लागल्याने चर्चेचा विषय ठरत आहेत. मुख्यमंत्री पदावरून सध्या राज्यात भाजप आणि शिवसेनेत रस्सीखेच सुरू आहे, तर जवळपास देवेंद्र फडणवीसांचं नाव स्पष्ट असल्याच्या चर्चा देखील आहेत. मात्र, लवकरच चित्र स्पष्ट होईल.