Devendra Bhuyar On Sanjay Raut : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काल ज्या अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांच्यावर गद्दारी केल्याचा आरोप केला होता. तेच देवेंद्र भुयार आज अपक्षांच्या भावना व्यक्त करण्यासाठी तसेच संजय राऊतांसंदर्भात बोलण्यासाठी शरद पवार यांच्याकडे नाराजी व्यक्त करण्यासाठी निघाले आहेत. याआधी एबीपी माझाशी बोलताना देवेंद्र भुयार यांनी म्हटलं की, आम्ही संजय राऊत यांच्या पक्षातून निवडून आलेलो नाही. मी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सोबत राहून निवडून आलो आहे, मग मी गद्दारी कशी केली असा त्यांनी सवाल केला आहे. 


आमदार देवेंद्र भुयार यांनी म्हटलं आहे की, मी संजय राऊत यांच्या पूर्वीपासून आघाडीपासून जोडलेला आहे. मी लोकसभा निवडणुकीपासून राष्ट्रवादी काँग्रेससोबत काम करत असून संजय राऊत आणि त्यांचा पक्ष तर विधानसभा निवडणुकीनंतर आघाडीसोबत आला. विश्वास मताच्या वेळेलाही महाविकास आघाडी सरकारला मतदान केलं होतं. गद्दारी करायची असती तर तेव्हाच केली असती, असं ते म्हणाले.


देवेंद्र भुयार यांनी म्हटलं आहे की, संजय राऊत यांचा चुकतंय, ते खूप मोठे नेते आहेत. मात्र असा आरोप करणे योग्य नाही. आपण पहिल्या पसंतीचं मत संजय पवार आणि दुसऱ्या पसंतीचं मत संजय राऊत यांना दिल्याचा दावाही त्यांनी केला आहे. मुळात शिवसेनेचं नियोजन चुकलं, शिवसेनेचे उमेदवार आणि आम्हाला फक्त हॉटेलमध्ये भेटले. एक फोन सुद्धा केलेला नाही असे भुयार म्हणाले. मला अजित पवार तसेच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष यांनी ज्या सूचना केल्या त्याप्रमाणे मतदान केल्याचा दावा त्यांनी केला. आज शरद पवारांना भेटून सांगणार की प्रामाणिकपणे मतदान करून ही या पद्धतीने आमची बदनामी केली जाणार असेल तर हे योग्य नाही. आम्ही पहिल्या दिवसापासून महाविकास आघाडी सरकार सोबत आहोत. आम्ही लोकांमधून निवडून आलेले आहे.. त्यामुळे आमच्याबद्दल असा गैरसमज निर्माण करणे योग्य नाही,असं भुयार म्हणाले.


भुयार यांनी म्हटलं आहे की, विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये नक्कीच अपक्षांना एकत्रित येऊन एक भूमिका घ्यावी लागेल. विचार करावा लागेल.  हा एकट्या अपक्षावर दाखवलेला अविश्वास नाही. तर सर्व अपक्षांवर दाखवलेला अविश्वास आहे. मी भाजपला मतदान कधीच करणार नाही, असंही ते म्हणाले. 


देवेंद्र भुयार यांनी म्हटलं आहे की,  मुख्यमंत्री कधीच भेटत नाहीत. अनेक पत्र लिहूनही उत्तर देत नाही. हे आम्ही मुख्यमंत्र्यांनाही सांगितलं आहे. मतदारसंघाची काम आम्ही राज्याचा प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांना नाही तर मग काय पंतप्रधान मोदींनी जाऊन सांगणार का? मुख्यमंत्री आम्हाला वेळ देत नाहीत ही आमची खंत आहे, असंही भुयार म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या