Devendra Fadanavis On Elections : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2024 च्या विधानसभा निवडणुकीवर भाष्य केले आहे. त्याशिवाय राज्यातील राजकीय घडामोडीवरही त्यांनी भाष्य केले आहे. यावेळी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्रही सोडलं. इडिया टुडे कॉनक्लेवमध्ये फडणवीस यांना 2024 विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रीपदावर प्रश्न विचारला असता त्यांनी सावध प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, एकनाथ शिंदे आणि मी एकत्र म्हणून निवडणूक लढवणार आहोत. पण आमच्याकडे एक हुकुमाचा एक्का आहे. त्याच्यापुढे सर्व चेहेरे फेल आहेत.
'महाविकास आघाडीला सत्तेतून खेचनं विश्वासघाताचा बदला'
राज्यात सत्तांतर झालं त्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 'आम्ही घेतलेला निर्णय योग्य होता.' यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही टीकास्त्र सोडलं. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेससोबत आघाडी करत भाजपासोबत विश्वासात घात केला. त्यामुळेच महाविकास आघाडीचं सरकार पाडने म्हणजे विश्वासघाताचा बदला होय, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. महाराष्ट्रात होणाऱ्या पुढील निवडणुका भाजप एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना यांच्यासोबत लढणार आहे, असेही यावेळी फडणवीस यांनी सांगितलं.
फडणवीस यांच्याशी चर्चा झाल्यानंतर शिंदे मुख्यमंत्री -
एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदावरही फडणवीस यांनी उत्तर दिलं. ते म्हणाले की, ठाकरे सरकार कोसळल्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले हे आश्चर्यचकित करणारं नव्हतेच. कारण, याबाबत माझ्यासोबत चर्चा झाली होती, त्यानंतर त्यांना मुख्यमंत्रीपद देण्यात आलं. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव माझाच होता, त्याला सर्वांनी पसंती दर्शवली. मला राज्य सरकारमध्ये कोणतेही पद नको होते, पण भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या आग्रहामुळे मी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. माझ्याकडे प्रशासकीय अनुभव आहेत, त्यामुळेच माझं सरकारमधून बाहेर राहणं योग्य नाही, असे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितलं.
2024 विधानसभा निवडणुकीत विजय आमचाच -
2024 मध्ये राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा विजय होईल, असा विश्वास यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलाय. ते म्हणाले की, 2024 मध्ये आमचाच विजय होईल. या निवडणुका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वात होणार आहेत. यामध्ये आमचाच विजय होईल.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांना हाताशी धरत शिवसेनेतून बंड केला होता. गुजरात, गुवाहाटी, गोवा ते विधानसभा असा प्रवास या 40 आमदारांनी केला होता. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातीन राजकारणाला वेगळं वळण मिळालं. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती.