कोल्हापूर :  ब्राह्मण समाजाविषयी केलेल्या विधानाबाबत 24 तासांत खुलासा करावा, अशी नोटीस खासदार राजू शेट्टी यांना बजावली आहे. हातकणंगले लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी नंदकुमार काटकर यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.

खासदार शेट्टी यांनी कुलकर्णी, देशपांडे, जोशी आडनावाच्या व्यक्‍ती सैन्यात कधीच भरती होत नाहीत. शेतकर्‍यांचीच मुलेच सैन्यात असतात, असे वक्‍तव्य केले होते.  वक्‍तव्याविरोधात विविध संघटनांनी शेट्टी यांच्याविरोधात तक्रारी दाखल केल्या होत्या. या पार्श्‍वभूमीवर 24 तासांत खुलासा करण्याची नोटीस खासदार शेट्टी यांना बजावण्यात आली.

'देशपांडे-कुलकर्णींची मुलं शहीद होत नाहीत', ब्राह्मण समाजाचं मन दुखावल्याबद्दल राजू शेट्टींचा माफीनामा

'स्वाभिमानी शेतकरी संघटने'चे खासदार राजू शेट्टी यांनी ब्राह्मण समाजाच्या भावना दुखावल्याप्रकरणी जाहीर माफी मागितली होती. कोल्हापुरातील सभेत बोलताना राजू शेट्टींनी केलेल्या वक्तव्यामुळे ब्राह्मण समाजात रोष व्यक्त केला जात आहे.


'देशासाठी हल्ल्यात शेतकऱ्यांची मुलं शहीद होतात, कुलकर्णी-देशपांडे यांची नाही. मात्र ते इतरांना देशभक्ती शिकवतात' असं वक्तव्य शेट्टींनी केल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. शहीदांना न्याय देण्याच्या हेतूने आपण हे वक्तव्य केल्याचं स्पष्टीकरण राजू शेट्टी यांनी दिलं होतं. मात्र ब्राह्मण समाजाच्या भावना दुखावल्याबद्दल त्यांनी जाहीर माफी मागितली. राजू शेट्टींविरोधात कोल्हापूरमध्ये पोलिसात तक्रारही दाखल करण्यात आली होती.

'स्वाभिमानी शेतकरी संघटने'कडून हातकणंगलेच्या जागेवर महाआघाडीचे उमेदवार असलेले विद्यमान खासदार राजू शेट्टी यांची कोल्हापूर जिल्ह्यातल्या हेरलेमध्ये प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. हातकणंगलेतून शिवसेनेचे धैर्यशील माने राजू शेट्टींविरोधात रिंगणात आहेत.

VIDEO | ब्राह्मण समाजाबद्दल आक्षेपार्ह विधानानंतर खासदार राजू शेट्टींचा माफीनामा | कोल्हापूर | एबीपी माझा