Lok Sabha Elections 2024 : भाजपचा विजयी रथ रोखण्यासाठी विरोधी पक्षाकडून मोर्चेबांधणी सुरू असून, ज्या बिहारमध्ये विरोधकांनी बैठक होणार आहे. तिथेच भाजपने आपली पहिली राजकीय मोहीम फत्ते केलीये. बिहारमध्ये 23 जून रोजी विरोधी ऐक्यासाठी एक मोठी बैठक होणार असताना, बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि हिंदुस्थानी अवाम मोर्चा (एचएएम) प्रमुख जीतन राम मांझी यांनी बुधवारी गृहमंत्री अमित शहा यांची 45 मिनिटे भेट घेतली. यावेळी जीतनराम मांझी म्हणाले की, "HAM तत्वतः भाजपसोबत आहे. आमचा पक्ष 2024 च्या निवडणुका भाजपसोबत लढणार आहे."
बिहारमधील नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यानंतर दोन दिवसांनी जीतन राम मांझी यांनी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते अमित शाह यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. ही भेट HAM ने सोमवारी बिहारमधील काँग्रेस, राजद आणि जनता दल युनाटेडच्या महाआघाडी सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यानंतर घेण्यात आल्याने सगळ्यांचे याकडे लक्ष होते.
जीतनराम मांझींनी केली मोठी घोषणा
जीतन राम मांझी म्हणाले की, "HAM भाजसोबत असून, 2024 च्या लोकसभा निवडणुका भाजप आणि आमचा पक्ष एकत्र लढेन. मी पुढील काही दिवस दिल्लीत राहणार असून, यादरम्यान ते एनडीएच्या नेत्यांना भेटण्याचा प्रयत्न करणार आहेत."
जीतनराम मांझी यांनी पाठिंबा काढून घेण्याचं कारण म्हणजे नितीश कुमार यांनी अलीकडेच बिहारचे माजी मुख्यमंत्री जीत राम मांझी यांच्यावर भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) फायद्यासाठी "महागठबंधन भागीदारांवर हेरगिरी" केल्याचा आरोप केला होता आणि ते म्हणाले होते की, त्यांनी आघाडीतून बाहेर पडणे ही चांगली गोष्ट आहे."
नितीश कुमार यांनी असेही म्हटले होते की, "मांझी यांना 23 जून रोजी विरोधी पक्षांच्या बैठकीत भाग घ्यायचा होता, परंतु याबैठकीतील चर्चेचा तपशील नंतर भाजपपर्यंत पोहोचू शकतो."
मांझी यांचा मुलगा आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष सुमन यांनी सांगितले होते की, "आम्ही पर्याय शोधण्यासाठी दिल्लीत येऊ आणि भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडीने त्यांना निमंत्रण दिल्यास एनडीएच्या निमंत्रणावर विचार करू. तिसरी आघाडी स्थापन करण्याचा पर्यायही आम्ही खुला ठेवत आहोत", असं त्यांनी स्पष्ट केले होते.
भाजपला का हवीये जीतनराम मांझींची साथ
'हम'चे प्रमुख जीतनराम मांझी दलित समुदायाचे प्रतिनिधीत्व करतात. आणि त्यांच्या राजकारणाचा प्रवाहही तोच आहे. आणि बिहारमध्ये सुमारे 16 टक्के दलित मतदार आहेत. बिहारमध्ये लोकसभेच्या 6 जागा, तर विधानसभेच्या 36 जागा दलित समाजासाठी राखीव आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे बिहारमध्ये ज्या दलित नेत्यांना लोकाश्रय आहे, त्यापैकी जीतनराम मांझी हे एक प्रमुख नाव आहे.
HAM ची सद्यस्थिती काय?
जीतनराम मांझी आणि त्यांच्या पक्षाच्या राजकीय ताकदीबद्दल सांगायचं झालं, तर 2020 च्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लक्षात घ्यावा लागेल. 'हम'ने सात जागांवर निवडणूक लढवली होती, त्यापैकी 4 जागा जिंकण्यात त्यांना यश आलं होतं.त्यांना 32.28 टक्के मते मिळाली होती. 2015 च्या निवडणूक निकालावर नजर टाकली तर मांझी यांच्या पक्षाने 21 जागांवर निवडणूक लढवली होती, पण त्यांना 1 जागा जिंकता आली होती. महत्त्वाचं म्हणजे त्यांना या निवडणुकीत 26.90 टक्के मते मिळाली. लोकसभेतील त्यांच्या पक्षाच्या प्रतिनिधीत्वाबद्दल सांगायचं झालं, तर त्यांचा एकही खासदार नाही.