मुंबई : महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 जागांबाबत चर्चा करण्यासाठी आज काँग्रेसच्या स्क्रिनिंग कमिटीच्या दोन बैठका पार पडल्या. या बैठकीनंतर नागपूरमधून नाना पटोले निवडणूक लढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच सोलापूरमधून सुशीलकुमार शिंदे, रामटेकमधून मुकुल वासनिक, यवतमाळमधून माणिकराव ठाकरे, नांदेडमधून अमिता चव्हाण यांची उमेदवारी निश्चित होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


दरम्यान स्क्रिनिंग कमिटीच्या बैठकीला विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित नव्हते. त्यांच्या अनुपस्थितीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. विखे पाटलांचा मुलगा सुजयच्या उमेदवारीचा फैसला न झाल्यामुळे विखे पाटलांनी बैठकीला दांडी मारल्याचे बोलले जात आहे. परंतु विखेंच्या कुटुंबातील एका व्यक्तीचे नुकतेच ऑपरेशन झाल्यामुळे ते आले नाहीत, असे स्पष्टीकरण काँग्रेसकडून देण्यात आले आहे.

बैठकीला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार बाळासाहेब थोरात, काँग्रेस नेते नाना पटोले उपस्थित होते. आजच्या बैठकीनंतर नाना पटोले केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री गडकरींच्या विरोधात नागपूरमधून निवडणूक लढण्याची दाट शक्यता आहे.

11 मार्च रोजी दिल्लीत काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीनंतर गुजरात आणि उत्तर प्रदेशप्रमाणे महाराष्ट्रातल्या उमेदवारांची काही नावे घोषित होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रातल्या दिग्गज नेत्यांनी लोकसभेच्या मैदानात स्वतः उतरावे अशी काँग्रेस हायकमांडची इच्छा आहे. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांना त्यांच्या मर्जीविरोधात निवडणूक लढवावी लागू शकते.