नवी दिल्ली:  लोकसभा निवडणूक 2019 साठीचे दिल्लीचे चित्र आता स्पष्टपणे दिसत आहे. आम आदमी पक्ष आणि कॉंग्रेसच्या होणाऱ्या युतीच्या चर्चेमुळे इतर पक्षांसाठी मोठी चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु याविषयी कोणताही तोडगा न काढता विषय संपवण्यात आल्यानंतर आपने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला.

कॉंग्रेस पक्षातून दिल्लीच्या सात पैकी सहा जागांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. आपने मात्र युती घोषित होण्यापूर्वीच सातच्या सात जागांची उमेदवारी जाहीर केली होती. तर रविवारी भाजपनेदेखील चार जागांवर आपले उमेदवार घोषित केले. सात पैकी तीन जागांबद्दल भाजपने अद्याप काही माहिती दिलेली नाही. या सर्व जागांवर 2014 मध्ये भाजपने विजय मिळवला होता.

आतापर्यंत सर्व पक्षांनी जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीवरुन या मतदारसंघातील लढती रंगतदार असल्याचं दिसून येत आहे. कॉंग्रेसने शीला दीक्षित यांना दिल्ली उत्तर पूर्व भागात उमेदवारी दिली आहे. या विभागाचं वैशिष्ट्य म्हणजे इथे तिनही उमेदवार ब्राह्मण आहेत, तिघेही मुळचे दिल्लीचे नाहीत आणि तिनही उमेदवार आपापल्या पक्षाचे प्रदेश अध्यक्ष किंवा संयोजक राहिले आहेत.

लोकसभेसाठी कॉंग्रेसचे चित्र पूर्णपणे स्पष्ट आहे, दिल्ली प्रदेशातील सर्व दिग्गज नेत्यांना कॉंग्रेसने मैदानात उतरवले आहे. तब्बल पंधरा वर्ष लोकप्रिय असलेल्या शीला दीक्षित यांचाही यादीत समावेश आहे. तर भाजपने आपल्या चार विद्यमान खासदारांवर विश्वास दाखवला आहे, पण या चारपैकी महेश गिरी, मिनाक्षी लेखी या खासदारांना अजूनही तिकीट देण्यात आलेले नाही.