मुंबई : काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील अनेक नेत्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मधुराव पिचड, अकोलेचे आमदार वैभव पिचड, राष्ट्रवादीचे साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले, नवी मुंबईतील राष्ट्रवादीचे आमदार संदीप नाईक आणि काँग्रेसचे वडाळ्याचे आमदार कालिदास कोळंबकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या माजी महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, नवी मुंबई महापालिकेचे माजी महापौर सागर नाईक यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. महात्मा फुले यांच्या वंशज नीता होले यांनी देखील आज भाजपमध्ये प्रवेश केला. तसेच माजी आयपीएस अधिकारी साहेबराव पाटील यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे, राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते.
मधुकर पिचड यांनी भाजपमध्ये नव्याने प्रवेश केलेल्यांच्या वतीने भावना व्यक्त केल्या. भाजपची वाट दाखवल्याबद्दल मधुकर पिचड यांनी राधाकृष्ण विखे पाटलांचे आभार मानले. महाराष्ट्राचा विकास होण्यासाठी, संपन्न होण्यासाठी जिकडे संपूर्ण देश जात आहे तिकडे आपण जावं, अशी कार्यकर्त्यांची भावना होती असं पिचड यांनी सांगितलं. आम्ही तुमच्या पक्षात आलो आहोत, आम्हाला बरोबरीने वागवावं असं आवाहनही त्यांनी मुख्यमंत्र्यांना केलं.
मधुकर पिचड यांचा भाजप प्रवेश आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा आम्हाला फायदा होईल. महाराष्ट्राच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात पिचड यांच्याबद्दल आदर आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. तसेच शिवाजी महाराजाचे वंशज, आमदार शिवेंद्रराजे भोसले, आमदार संदीप नाईक, आमदार वैभव पिचड, आमदार कालिदास कोळंबकर, चित्रा वाघ यांच्यावर स्तुतीसुमनं उधळत मुख्यमंत्र्यांनी या सर्वांचे भाजपमध्ये स्वागत केलं.
शिवसेना-भाजप-मित्रपक्ष युती अभेद्य
विरोधी पक्षातील अनेक नेते भाजपमध्ये येत आहेत. त्यामुळे भाजपची ताकद वाढत आहे. तसेच आगामी निवडणूक भाजप आणि शिवसेना एकत्रितपणे लढतील असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. भाजप, शिवसेना आणि मित्रपक्ष ही युती अभेद्य आहे. त्यामुळे आम्ही स्वबळावर लढवणार अशा बातम्या चुकीच्या असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.
राज्यात पुन्हा युतीचंच सरकार येईल. मात्र यंदा विक्रमी जागा जिंकण्याचा आमचा मानस असणार आहे. पुढील 8-10 दिवसात विधानसभेतील जागांबाबत निर्णय घेऊ, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.