Bunty Shelke: राज्यभरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला आहे. दिल्लीतील नेते देखील राज्यभरात सभा घेत आहेत. अशातच एका उमेदवाराच्या प्रचाराचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होताना दिसत आहे. नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे अधिकृत उमेदवार बंटी शेळके यांचा हा व्हिडिओ आहे. बंटी शेळके हे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आहेत, मात्र, ते पळत पळत भाजपा कार्यालयात घुसतात, आणि तेथील कार्यकर्त्यांची गळाभेट आणि जेष्ठ्य नेत्यांचे आशीर्वाद घेताना दिसतात, हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाल्यामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या घटनेचा व्हिडीओ खुद्द बंटी शेळके यांनी देखील आपल्या एक्स अकाऊंटवर शेअर केला आहे. मध्य नागपुरात काँग्रेसचे बंटी शेळके विरुद्ध भाजपचे प्रवीण दटके अशी लढत होणार आहे.
नेमकं काय घडलं?
नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार बंटी शेळके आणि भाजपाचे प्रवीण दटके यांच्यात थेट लढत होणार आहे. काल (सोमवारी) सायंकाळच्या सुमारास बंटी शेळके प्रचार करत होते, प्रचाराच्या दरम्यान ते अचानक भाजपाच्या संपर्क कार्यालयात पळत-पळत गेले. कार्यालयात उपस्थित असलेल्या भाजपाच्या कार्यकर्त्यांशी त्यांनी हस्तांदोलन केलं, त्यांना मिठी मारली. भाजप कार्यालयातील ज्येष्ठ कार्यकर्त्यांचे बंटी शेळके यांनी आशीर्वाद देखील घेतले आणि त्यानंतर काही वेळातच ते तिथून पुढे आपल्या प्रचारासाठी निघून गेले. बंटी शेळके यांच्या या भेटीमुळे आणि कृतीमुळे कार्यालयातील भाजपा कार्यकर्तेही थोडे चक्रावल्याचं दिसून आलं, पण त्यांनीही बंटी शेळके यांना हात मिळवत शुभेच्छा दिल्या.बंटी शेळके यांचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे, काहीजण त्यांचं कौतुक देखील करत आहेत.
व्हायरल व्हिडिओवर काय म्हणाले बंटी शेळके?
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ सोशल मिडियावर बोलताना म्हणाले, माझा लढा कोणा व्यक्तीशी नाही, तर विचारांशी आहे. मध्य नागपूर असो किंवा संपूर्ण नागपूर शहरातील कोणताही नागरिक, पक्ष, जात, धर्म कोणताही असो, प्रत्येक व्यक्ती माझ्यासाठी महत्त्वाची आहे. प्रत्येक नागरिकासाठी सदैव उपस्थित राहून तुमची सेवा करण्याचा माझा संकल्प आहे, असं पुढे बंटी शेळकेंनी म्हटलं आहे.
कोण आहेत बंटी शेळके?
युवक काँग्रेसचा एक सामान्य कार्यकर्ता ते संघटनेचे राष्ट्रीय सरचिटणीस बंटी शेळके यांची वाटचाल आहे. यांत्रिकी अभियांत्रिकीची पदविका प्राप्त 45 वर्षीय बंटी शेळके हे त्यांचे वडील बाबा शेळके काँग्रेस विचारसरणीचे आहेत. ‘घंटानाद’ या संघटनेच्या माध्यमातून लोकहिताच्या प्रश्नावर आंदोलन करत. वडिलांची प्रेरणा घेत बंटी शेळके यांनीही लोकांच्या प्रश्न मांडत स्थानिक प्रशासनाला विरोध करत आंदोलने करण्यात सुरूवात केली.