मुंबई : काँग्रेसचे एक-एक नेते भाजपच्या गोटात सामील होताना दिसत आहेत. मुंबईतील काँग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकर भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना पुन्हा उधाण आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर शिवसेना-भाजप युतीचा प्रचार करण्याचे संकेत कोळंबकरांनी दिले आहेत.

दक्षिण मध्य मुंबईतून आघाडीचे उमेदवार असलेल्या काँग्रेसच्या एकनाथ गायकवाड यांच्याकडून कोणताही संपर्क झालेला नाही, तर युतीचे उमेदवार असलेले शिवसेनेचे विद्यमान खासदार राहुल शेवाळे आपल्या संपर्कात आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर मी युतीचा प्रचार करणार, असा इशारा कालिदास कोळंबकरांनी दिली आहे.

मला अजून बॉसचा आदेश आला नाही. त्यामुळे मी अजून काही ठरवलं नाही, असं सूचक वक्तव्य कोळंबकरांनी केलं. 'बॉस म्हणजे कोण?' असं विचारलं असता, मी भविष्यात ज्या पक्षात जाणार आहे, त्या पक्षाचे बॉस, असं उत्तर कोळंबकरांनी दिलं.

VIDEO | जया प्रदांबद्दल वादग्रस्त वक्तव्यानंतर आझम खान यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल 



कोळंबकर मुंबईतील वडाळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. मुंबईतील पूर्वीच्या नायगाव आणि आताच्या वडाळा मतदारसंघातून सहा वेळा कोळंबकर विधानसभेवर निवडून आले आहेत.

यापूर्वीच कालिदास कोळंबकर यांच्या कार्यालयांच्या बॅनरवर काँग्रेस नेत्यांऐवजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो दिसले होते. दादरमधील काँग्रेसच्या टिळक भवन कार्यालयासमोरच कालिदास कोळंबकर यांनी बॅनरवर मुख्यमंत्र्यांचा फोटो लावून आपला इरादा जाहीर केला होता.