Congress Rajya Sabha : काँग्रेसने राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावांची घोषणा केल्यानंतर पक्षातील अंतर्गत धुसफूस समोर येऊ लागली आहे. राज्यसभेसाठी संधी न मिळाल्याने काँग्रेसमधील काही नेत्यांनी सोशल मीडियावर आपली नाराजी व्यक्त केली आहे. अभिनेत्री आणि काँग्रेस नेत्या नगमा मोरारजी यांनी सोनिया गांधींनी 18 वर्षांपूर्वी दिलेला शब्द पाळला नसल्याचा आरोप केला आहे. 


काँग्रेसने महाराष्ट्रातून उत्तर प्रदेशमधील इम्रान प्रतापगडी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. इम्रान प्रतापगडी हे काँग्रेसच्या अल्पसंख्यांक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. महाराष्ट्रातून काँग्रेसला एकही योग्य उमेदवार मिळाला नाही का,  असा प्रश्न उपस्थित होत असताना काँग्रेसमधील नाराजी समोर आली आहे. काँग्रेसने राजस्थानमधील तीन जागांसाठीदेखील दुसऱ्या राज्यातील उमेदवारांना संधी दिली आहे. राजस्थानमधून काँग्रेसने रणदीप सुरजेवाला,मुकुल वासनिक, प्रमोद तिवारी यांना संधी दिली आहे. तर,  कर्नाटकातून जयराम रमेश, छत्तीसगडमधून राजीव शुक्ला, रणजीत रंजन,  हरियाणातून अजय माकेन यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 


सोनियांनी शब्द पाळला नाही; नगमांनी व्यक्त केली खदखद


काँग्रेसमध्ये राज्यसभेसाठी अनेकजण उत्सुक होते. काँग्रेसने आपले उमेदवार जाहीर केल्यानंतर अनेकांनी नाराजी व्यक्त केली. अभिनेत्री आणि काँग्रेसच्या नेत्या नगमा यांनी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी शब्द पाळला नसल्याचे म्हटले. सोनिया गांधी यांनी 18 वर्षांपूर्वी पक्ष प्रवेश करताना राज्यलसभा उमेदवारी देणार असल्याचे आश्वासन दिले होते. त्यावेळी काँग्रेस पक्ष सत्तेवर होता. तेव्हापासून आपण सोनिया गांधी या दिलेला शब्द पूर्ण करतील या अपेक्षेवर असल्याचे सांगितले. 







काँग्रेस प्रवक्ते पवन खेरा यांनीदेखील आपली तपश्चर्या कमी पडली असल्याचे म्हटले. त्यांनी केलेल्या या ट्वीटचा रोख राज्यसभा उमेवारीवर असल्याची चर्चा आहे. 







नगमा यांनी पवन खेरा यांचे हे ट्वीट रिट्वीट करत माझी 18 वर्षाची तपश्चर्या इम्रान यांच्यासमोर कमी पडली असल्याचे म्हटले. 







काँग्रेसने महाराष्ट्रातून संधी दिलेले इम्रान प्रतापगडी कोण आहेत?


इम्रान प्रतापगडी हे उत्तर प्रदेशातील 34 वर्षीय मुस्लिम तरुण चेहरा आहे. उर्दू कवी अशीही त्यांची ओळख आहे.कॉंग्रेसच्या अल्पसंख्यांक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्याशिवाय, कॉंग्रेसमधील राहुल गांधी यांच्या तरुण फळीतील विश्वासू सहकारी असून उत्तर प्रदेश निवडणुकीत प्रियांका गांधी यांच्यासोबत प्रचाराची धुरा सांभाळली होती.