Congress First List | विधानसभेसाठी काँग्रेसची पहिली यादी जाहिर, 51 उमेदवारांच्या नावाची घोषणा
एबीपी माझा वेब टीम | 29 Sep 2019 07:42 PM (IST)
पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव या यादीत नाही. सातारा पोटनिवडणूक लढविण्याची शक्यता असल्याने त्यांचे या यादीत नाव नसल्याचे बोलले जात आहे. दरम्यान उद्या प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण आपापल्या मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. पहिल्या यादीत ५१ उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, प्रणिती शिंदे यांच्या नावाचा समावेश आहे. दरम्यान, पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव या यादीत नाही. सातारा पोटनिवडणूक लढविण्याची शक्यता असल्याने त्यांचे या यादीत नाव नसल्याचे बोलले जात आहे. या यादीत काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांची नावं आहेत. काँग्रेसचे जे परंपरागत मतदारसंघ आहेत आणि महत्वाचं म्हणजे ज्या जागेबद्दल वाद नाही अशा मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा या यादीत झाली आहे. यामध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, प्रणिती शिंदे, यशोमती ठाकूर, विजय वडेट्टीवार, विश्वजीत कदम, अमित देशमुख, नितीन राऊत आदींचा समावेश आहे. कॉंग्रेस पक्षश्रेष्ठींनी भाजपच्या संपर्कात असल्यामुळे आपल्या सहा आजी माजी आमदारांना विधानसभेच्या निवडणुकीचे तिकीट न देण्याचा निर्णय घेतला आहे. या सहा जणांत अस्लम शेख, राहुल बोंद्रे, काशिराम पावरा, डी. एस. अहिरे, सिद्धराम म्हेत्रे, भारत भालके यांचा समावेश आहे. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना संगमनेरमधून, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना भोकर मतदारसंघातून, काँग्रेसचे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांना ब्रह्मपुरी येथून, सोलापूर शहर मध्यमधून विद्यमान आमदार प्रणिती शिंदे तर लातूर शहरमधून अमित देशमुख यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. दरम्यान उद्या प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण आपापल्या मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. काँग्रेसच्या पहिल्या यादीत सोलापुरातून मध्य सोलापूर मतदारसंघात आमदार प्रणिती शिंदे यांना उमेदवारी तर दक्षिण सोलापुरातून नगरसेवक मौलाली सय्यद उर्फ बाबा मिस्त्री यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मागील निवडणुकात काँग्रेसने दक्षिण सोलापुरातून दिलीप माने यांना उमेदवारी दिली होती मात्र माने शिवसेनेत गेल्याने नवीन चेहरा रिंगणात उतरवला आहे. लातूर शहर मतदारसंघामधून आमदार अमित देशमुख आणि औसा मतदारसंघामधून बसवराज पाटील मुरूमकर यांना तिसऱ्या वेळी संधी देण्यात आली आहे. तर निलंगा विधानसभा मतदारसंघात अशोक पाटील निलंगेकरांना दुसऱ्या वेळी संधी देण्यात आली आहे. तिथं त्यांची लढत त्यांचे पुतणे भाजपाचे मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्याशी होईल. गेल्यावेळी तिथं त्याचा पराभव झाला होता. परभणीच्या पाथरी विधानसभा मतदारसंघातून माजी मंत्री सुरेश वरपुडकर यांना पुन्हा एकदा काँग्रेसकडून संधी देण्यात आली आहे. सुरेश वरपुडकर हे शरद पवार यांचे खंदे समर्थक होते. मात्र मागच्या 2014 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता आणि काँग्रेसकडून त्यांनी 2014 ची निवडणूक पाथरीमधून लढवली होती. यामध्ये त्यांचा पराभव झाला होता. कॉंग्रेस उमेदवारांची पहिली यादी