Congress Manifesto Committee : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं तयारी सुरु केली आहे. शुक्रवारी (22 डिसेंबर) काँग्रेसने जाहीरनामा समितीची घोषणा केली. यामध्ये राहुल गांधी यांच्या नावाचा समावेश नसल्याचे दिसले. त्याशिवाय महाराष्ट्र काँग्रेसच्या एकाही नेत्याचा समावेश नाही. काँग्रेसचे सरचिटणीस (संघटन) केसी वेणुगोपाल यांनी सांगितले की, काँग्रेस अध्यक्षांनी आगामी सार्वत्रिक निवडणुका 2024 साठी तात्काळ प्रभावाने जाहीरनामा समिती स्थापन केली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा तयार करण्यासाठी ही समिती काम करेल. 






काँग्रेस सरचिटणीस यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली. त्यांनी जारी केलेल्या प्रेस रिलीजनुसार, या जाहीरनामा समितीचे नेतृत्व पी चिदंबरम यांच्याकडे सोपवण्यात आलेय. तर टीएस सिंहदेव यांना समन्वयक करण्यात आलेय. या समितीमध्ये एकूण 16 काँग्रेस नेत्यांचा समावेश आहे. त्यामध्ये प्रियंका गांधी, सिद्धारमय्या, शशी थरूर यासारख्या दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. त्याशिवाय आनंद शर्मा, जयराम रमेश, गायखंगम, गौरव गोगोई, प्रवीण चक्रवर्ती, इमरान प्रतापगढी, के राजू,ओमकार सिंह मरकाम, रंजीत रंजन, जिग्नेश मेवाणी आणि गुरदीप सप्पल यांचाही समावेश आहे. 







राष्ट्रीय समितीची स्थापन  


याआधी काँग्रेस पक्षाने आगामी सार्वत्रिक निवडणुकांसाठी इंडिया आघाडीमध्ये समाविष्ट असलेल्या पक्षांसह जागा वाटपावर चर्चा करण्यासाठी पाच सदस्यीय राष्ट्रीय समिती स्थापन केली होती. मोहन प्रकाश यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती आहे. 


दोन माजी मुख्यमंत्र्यांचा समावेश - 


मोहन प्रकाश यांच्या अध्यक्षतेखालील समितीमध्ये दोन माजी मुख्यमंत्र्यांचाही समावेश करण्यात आलाय. त्यामध्ये माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि भूपेश बघेल यांचा समावेश करण्यात आला. त्याशिवाय माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद आणि मुकुल वासनिक यांचाही समावेश आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटप जुळवण्यासाठी आघाडीतील मित्रपक्षांशी वाटाघाटी करणे हा समितीचा प्रमुख्य उद्देश आहे.


काँग्रेसची जोरदार तयारी


लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि भाजपसह देशातील सर्वच पक्षांनी तयारी सुरु केली. काँग्रेस पक्षानेही आपली तयारी जोरात सुरु केली आहे. इंडिया आघाडीच्या आतापर्यंत चार बैठका झाल्या आहेत. या बैठकानंतर काँग्रेस पक्षाने लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. याआधी, काँग्रेस हायकमांडने यूपी, ओडिसा आणि पश्चिम बंगालमधील पक्षाच्या नेत्यांच्या बैठका घेतल्या.