Haryana Congress Candidate List चंदीगड : हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं आपल्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. काँग्रेसनं काही दिवसांपूर्वी पहिली यादी जाहीर केली होती. आता दुसऱ्या यादीत 9 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आलेली आहे. काँग्रेसनं आतापर्यंत 41 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. 


काँग्रेसनं दुसऱ्या यादीत थानेसर येथूनन अशोक अरोरा, गन्नोर येथून कुलदीप शर्मा,  उचाना कला येथून बृजेंद्र सिंह, तोहाना येथून परमवीर सिंह, तोशाम येथून अनिरुद्ध चौधरी,  मेहाम येथून बलराम डांगी, नांगल येथे मंजू चौधरी आणि बादशाहपूर येथून वर्धन यादव आण गुरुग्राम येथून मोहित ग्रोवर यांना उमेदवारी दिली आहे. 


काँग्रेसनं दुसऱ्या यादीत माजी उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांच्या विरोधात उमेदवार जाहीर केला आहे. माजी खासदार बृजेंद्र सिंह यांना उमेदवारी देण्यात आली आहे. उचाना कला या मतदारसंघात दुष्यंत चौटाला आणि बृजेंद्र सिंह यांच्यात लढत होईल. ते बीरेंद्र चौधरी यांचे पुत्र आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी ते भाजप सोडून काँग्रेसमध्ये परत आले होते. 


तोशाम विधानसभा मतदारसंघात किरण चौधरी यांची मुलगी श्रृती चौधरी हिच्या विरुद्ध अनिरुद्ध चौधरी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री बन्सीलाल यांचे ते नातू आहेत. म्हणजेच बन्सीलाल यांचा नातू आणि नात  या विधानसभा मतदारसंघात आमने सामने येणार आहेत. काँग्रेसनं गुरुग्राममधून मोहित ग्रोवर आणि बादशाहपूर येथून वर्धन यादव या तरुणांना उमेदवारी दिली आहे. दुसरीकडे गन्नौरमधून कुलदीप शर्मा, थानेसर येथून अशोक अरोरा, टोहनामध्ये परमवीर सिंह आणि मेहम येथून बलराम डांगी यांना काँग्रेसनं उमेदवारी दिलेली आहे. 


काँग्रेसकडून 41 उमेदवारांच्या नावांची घोषणा 


हरियाणा विधानसभेची सदस्य संख्या 90 इतकी आहे. काँग्रेसनं आतापर्यंत 41 नावांची घोषणा केलेली आहे. यापूर्वी काँग्रेसनं पहिल्या यादीत 32 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली होती. पहिल्या यादीत काँग्रेसनं माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंह हुड्डा यांना उमेदवारी जाहीर केली होती. तर, पैलवान विनेश फोगाट हिला देखील जुलाना विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसनं उमेदवारी जाहीर केली आहे. 


हरियाणा विधानसभेसाठी एका टप्प्यात मतदान होणार आहे. नव्यानं जाहीर करण्यात आलेल्या तारखेनुसार 5 ऑक्टोबरला मतदान होईल. तर, मतमोजणी 8 ऑक्टोबरला होणार आहे. हरियाणा विधानसभा निवडणुकीत गेल्यावेळी कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेलं नव्हतं. भाजपनं जेजेपीच्या मदतीनं सरकार स्थापन केलं होतं.




इतर बातम्या : 


'जो राम को लाए हैं' गाणं  उत्तर प्रदेशात भाजपच्या प्रचारात खूप वाजलं, हरियाणाच्या निवडणुकीवेळी गायक कन्हैया मित्तल काँग्रेसच्या वाटेवर