मुंबई : राज्यातील मुख्यमंत्री पदावरुन शिवसेना-भाजपमध्ये रस्सीखेच सुरु झाली आहे. निवडणुकीतील निकालानंतर शिवसेनेने मुख्यमंत्री पदावर दावा करावा, असा शिवसैनिकांचा आग्रह आहे. वरळीत आदित्य ठाकरे यांचे भावी मुख्यमंत्री असे बॅनर्सही लावण्यात आले होते. मात्र मुख्यमंत्री भाजपचाच होणार असल्याचं महाराष्ट्र भाजप प्रभारी सरोज पांडे यांनी स्पष्ट केलं आहे.


महाराष्ट्रात भाजपची कामगिरी चांगली आहे, मात्र आम्हाला अधिकची अपेक्षा होती. मात्र लोकांनी आम्हाला दिलेल्या आशीर्वादाचे आभार मानतो. आमच्या जाहीरनाम्यात दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करु, असं आश्वासन सरोज पांडे यांनी दिलं.



तसेच युतीच्या 50-50 च्या फॉर्म्युल्यावर चर्चा झाली नसून आमच्या पक्षाचे अध्यक्ष अमित शाह याबाबत चर्चा करतील असं त्यांनी सांगितलं. दिवाळीनंतर सत्तास्थापनेचा निर्णय घेतला आणि मुख्यमंत्री भाजपचाच असेल, असं सरोज पांडे यांनी म्हटलं. त्यामुळे भाजप मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडणार नाही, असं स्पष्ट आहे.


विधानसभा निवडणुकीत भाजपने 105 जागा जिंकल्या, मात्र 2014 च्या निवडणुकीच्या तुलनेत भाजपला 17 जागा कमी मिळाल्या आहेत. तर शिवसेनेला 56 जागाच मिळाल्या मात्र, शिवसेनेला केवळ 7 जागांचा फटका आहे. त्यामुळे शिवसेनेची कामगिरी निवडणुकीत भाजपपेक्षा चांगली होती, त्यामुळे शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. ही संधी साधत शिवसेनेनं भाजपवर दबाव टाकण्यास सुरुवात केली आहे. मात्र भाजपनेही मुख्यमंत्री पद आपल्याकडेच असणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.