सातारा : आज माझ्यासाठी खूप मोठा दिवस आहे. आतापर्यंत आमचे राजे अनेकदा माझ्यासोबत मंचावर उपस्थित होते पण आज आमचे राजे आमच्या मंचावर उपस्थित आहेत.
इतिहासात जेव्हा जेव्हा एखाद्या मावळ्यांनं चांगलं काम केलं तेव्हा तेव्हा छत्रपतींनी पगडी घालून त्यांचं कौतुक केले. आज मला उदयनराजे यांनी पगडी घातली आणि शिवेंद्रसिंहराजे यांनी मला तलवार दिली, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साताऱ्यातील महाजनादेश यात्रेच्या सभेत म्हणाले. छत्रपतींनी विनंती करायची नसते तर आदेश द्यायचा असतो, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.


यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, मला काही पत्रकारांनी विचारलं की निवडणुकीचा निकाल आधीच लागलेला असताना तुम्ही एवढे कष्ट करून महाजनादेश यात्रा का काढता आहात. पण जनतेसोबत संवाद साधण्यासाठीची यात्रा आहे, असे ते म्हणाले.

यावेळी ते म्हणाले की, दोन्ही राजे आमच्याकडे कोणतीही अट टाकून आलेले नाहीत. या दोघांनी यादी दिली पण ती लोकांच्या कामांची होती. वैयक्तिक कामांची आजिबात दिली नाही. आज जे नेते उदयनराजे आणि शिवेंद्रसिंहराजे राजे यांच्यावर टीका करत आहेत, त्यांना लोक त्यांची जागा दाखवून देतील, असे मुख्यमंत्री म्हणाले.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी सातारा  लोकसभेची निवडणूक विधानसभेसोबत होईल, असेही स्पष्ट केले.

तसेच सातारला वैद्यकीय महाविद्यालय बनवू. बारामतीला त्यासाठी पाचशे कोटी रुपये आमच्या सरकारने दिलेत. तुम्ही तर छत्रपती आहात. तुम्ही आदेश द्यायचा. मी आत्ताच सातारमधील रस्त्यांसाठी पन्नास कोटी रुपये मंजूर करतो, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.

आम्ही पश्चिम महाराष्ट्रातील रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्याची व्यवस्था केली आहे. उद्या गिरीश महाजन जिहे कठापूरच्या कामाचं भूमिपूजन करणार आहेत. बेघरांसाठी अतिक्रमण नियमित करुन त्यांना घराचा हक्क देतो आहोत, असेही ते म्हणाले.