सोलापूर :   विरोधकांच्या मुजोरीमुळे जनतेने त्यांना नाकारलं आहे, त्यांच्या यात्रेकडे कुणी फिरकतही नाही. भाजप आणि मोदींकडून चारीमुंड्या चीत झाल्यावर ईव्हीएम खराब आहे असं विरोधक म्हणतात. मात्र  खराबी ईव्हीएममध्ये नाही तुमच्या खोपडीत आहे, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. सोलापुरात भाजपच्या महाजनादेश यात्रेच्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी गृहमंत्री अमित शाह देखील उपस्थित होते.


यावेळी फडणवीस म्हणाले की, विरोधक ईव्हीएमवरून टीका करतात. मात्र बारामतीत ईव्हीएम चांगलं आणि सोलापुरात खराब? असं कसं. अभ्यास न करता परीक्षेला गेल्यावर नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांसारखी विरोधकांची अवस्था आहे. अभ्यास न करता पेन नालायक निघाला असं म्हणणारे हे विद्यार्थी आहेत.  जनतेच्या मनात मोदीजी आहेत. त्यामुळे ते कमळाचेच बटन दाबतात म्हणून तुम्ही हारता, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

ते म्हणाले की,  काँग्रेस राष्ट्रवादीच्या पैलवानांना चारीमुंड्या चीत केलं आहे. आता त्यांचे पैलवान उठायला तयार नाही.  आमची यात्रा सन्मानाची यात्रा आहे. जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी ही यात्रा आहे. काँग्रेस  आणि राष्ट्रवादीनेही यात्रा काढल्या मात्र त्याच्या यात्रांची अवस्था वाईट आहे, असे फडणवीस म्हणाले.

फडणवीस पुढे म्हणाले की, त्यांच्या सरकारच्या काळात पश्चिम महाराष्ट्रातले डझनभर मंत्री असूनही एकही प्रकल्प पूर्ण करू शकले नाहीत आम्ही ते करून दाखवलं.  कृष्ण भीमा स्थिरीकरण आम्ही करून दाखवू, कोकणातील पाणी पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आणून दुष्काळमुक्त करू असेही ते म्हणाले.

आमच्या पाठीशी मोदी आहेत, त्यामुळं चिंता करण्याचं कारण नाही. सिंचनात महाराष्ट्रात पहिला केल्याशिवाय राहणार नाही. गुंतवणूक, उद्योग, रोजगारात महाराष्ट्र पहिला आहे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मी पुन्हा येणार हा नारा पुन्हा एकदा लगावला.

भाजपने पूर्ण दरवाजे उघडले तर राष्ट्रवादी दिसणार नाही : अमित शाह

मोठ्या प्रमाणावर भाजपमध्ये प्रवेश सुरु आहेत. आम्ही चंद्रकांत पाटलांना व्यवस्थित प्रवेश घ्या म्हणून सांगितलं आहे. भाजपने जर प्रवेशासाठी पूर्ण दरवाजे उघडले तर शरद पवार यांची राष्ट्रवादी दिसणार नाही, अशा शब्दात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी टीका केली.  यावेळी ते म्हणाले की, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे लोकशाही मूल्यांना मानत नाहीत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये फक्त घराणेशाही आहे.  सामान्य युवकांना अधिकार नाही का? यांनी राजकारणाला स्वतःचा ठेका समजला आहे, असे शाह म्हणाले. यावेळी ते म्हणाले की,  अजित पवारांनी सिंचन घोटाळा केला. 74 हजार कोटींचा घोटाळा अजित पवारांनी केला तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस यांनी 22 हजार गावात जलयुक्त शिवारच्या माध्यमातून पाणी आणलं.    विरोधकांनी केंद्र आणि राज्यात सत्ता असताना देखील घोटाळा केला. शहीदांसाठी केलेल्या घरात देखील घोटाळा केला.  आम्ही आजपर्यंत 1 रुपयांचा घोटाळा केला नाही, असेही ते म्हणाले.