रायपूर :  लोकसभेच्या निवडणुकीची सेमीफायनल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 5 राज्यांच्या निवडणुकीच्या निकालात भाजपला चांगलाच हादरा बसला आहे. भाजपच्या हातून त्यांची सत्ता असणारी महत्वाची राज्ये निसटण्याची शक्यता आहे. यामध्ये गेल्या 15 वर्षांपासून एकहाती सत्ता असलेल्या छत्तीसगडमध्ये भाजपाला हादरा बसण्याची चिन्हे आहेत. 90 जागा असलेल्या छत्तीसगडध्ये काँग्रेस 57 तर भाजपा 25 जागांवर आघाडीवर आहे.


गेली 15 वर्षे सत्तेत असलेल्या भाजपाला काँग्रेसने चांगलेच आव्हान दिले आहे. ‘चावलवाला बाबा’ म्हणून प्रसिद्ध असलेले मुख्यमंत्री रमणसिंह यांनी लागोपाठ चौथ्यांदा निवडणूक जिंकण्यासाठी सारी ताकद पणाला लावली होती. मात्र ही ताकद अपुरी पडल्याचे हाती आलेल्या निकालावरून स्पष्ट होत आहे.

राज्यातील जनमानसात आमची प्रतिमा चांगली आहे. आम्ही केलेल्या कामाच्या बळावर जनता आम्हाला पुन्हा सत्तेत बसवेल. छत्तीसगडमध्ये भाजपचीच सत्ता येणार आहे, असा दावा निकालापूर्वी मुख्यमंत्री रमणसिंह यांनी केला होता, मात्र हा दावा खोटा ठरताना दिसून येत आहे.

90 जागा असलेल्या छत्तीसगडमध्ये 2013 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 49 जागा मिळवत एकहाती सत्ता मिळवली होती. या निवडणुकीत काँग्रेसला 39 जागा तर बसपाला एका जागेवर विजय मिळवता आला होता. गेल्या 15 वर्षांपासून छत्तीसगडमध्ये भाजपची सत्ता आहे. गेल्या वेळी भाजपला 41 टक्के तर काँग्रेसला 40.3 तर बसपला चार टक्के मते मिळाली होती.

15 वर्ष सत्ता उपभोगल्यानंतर भाजपच्या विरोधात वातावरण निर्माण झाले आहे. मात्र काँग्रेसचे मुख्यमंत्री राहिलेले अजित जोगी यांनी काँग्रेसला रामराम ठोकत आपला नवा पक्ष  (जनता काँग्रेस छत्तीसगड ) निर्माण करत ही निवडणूक रोमांचक बनवली.