रायपूर : छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. छत्तीसगड विधानसभेच्या 18 जागांसाठी आज मतदान होत आहे. दहा जागांसाठी सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली असून दुपारी 3 वाजेपर्यंत याठिकाणी मतदान होणार आहे. तर इतर आठ जागांसाठी मतदान 8 वाजता सुरूवात झाली असून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू राहणार आहे.


छत्तीसगड विधानसभेच्या 90 जागांसाठी दोन टप्प्यात मतदान होणार आहे. यामध्ये आज 18 जागांसाठी, तर उरलेल्या 72 जागांसाठी 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे.


निवडणुकीच्या प्रचारादरम्यान नक्षलवाद्यांनी दहशत निर्माण करण्यासाठी तीन वेळा हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये अनेक जवान जखमी झाले, अनेक नागरिकांचाही यामध्ये मृत्यू झाला.


या पार्श्वभूमीवर राज्यात निवडणुका शांततेत पार पडाव्या यासाठी कडेकोड बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. जवळपास सव्वा लाख जवान विविध ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत. नक्षलवाद्यांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचं आवाहन नागरिकांना केलं आहे.


नक्षलग्रस्त भागातील आठ जिल्ह्यात मुख्यमंत्री रमन सिंह यांच्यासह 190 उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे.


छत्तीसगडमधील चित्र काय?

छत्तीसगड विधानसभेत 90 आणि लोकसभेच्या 11 जागा आहेत. 2013 सालच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 49 आणि काँग्रेसने 39 जागांवर विजय मिळवला होता. तर 2014 सालच्या लोकसभा निवडणुकीत 10 जागा भाजपला आणि काँग्रेसला एक जागा मिळाली होती. डॉ. रमन सिंह 7 डिसेंबर 2003 रोजी मुख्यमंत्री म्हणून विराजमान झाले.

 संबंधित बातम्या 


छत्तीसगड ओपिनियन पोल : 15 वर्षांनंतर भाजपच्या हातून सत्ता जाण्याची चिन्हं


मोदींच्या दौऱ्यापूर्वी दंतेवाड्यात नक्षली हल्ला, एका जवानासह 4 जणांचा मृत्यू