नागपूर/ नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज पार पडला. भाजपच्या 19, शिवसेनेच्या 11 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवारांनी मंत्रिमंडळ विस्तार करताना भाकरी फिरवल्याचं पाहायला मिळालं. छगन भुजबळ, अनिल पाटील, दिलीप वळसे पाटील, संजय बनसोडे, धर्मरावबाबा अत्राम या नेत्यांना मंत्रिपदाची संधी देण्यात आली नाही. मंत्रिपद न मिळाल्यानं छगन भुजबळ नाराज असल्याचं पाहायला मिळालं. आज छगन भुजबळ हॉटेल रॅडिसन ब्ल्यू मध्येच होते. शपथविधी सोहळ्याला देखील ते उपस्थित राहिले नाहीत.  


माजी मंत्री छगन भुजबळ हॉटेल रेडिसन ब्ल्यू मधेच होते. आज दिवसभर छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यक्रमासह शपथविधीला जाणं देखील टाळलं असल्याचं पाहायला मिळालं. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत राज्यभरात महायुतीसाठी ओबीसी समाजाची ढाल म्हणून काम करून देखील मंत्रिपद न मिळाल्याने भुजबळांची नाराजी असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी एबीपी माझाला दिली. 


राजकीय लढाईत लढण्यासाठी छगन भुजबळांची गरज मात्र ज्यावेळी मंत्रिपदाची संधी द्यायची वेळ आली त्यावेळी थेट डावलणं योग्य नसल्याची भावना देखील व्यक्त करण्यात आली. 


राज्यात आमदारांची घरं जळत असताना ओबीसींच्या घरांवर हल्ले होत असताना सगळे ओबीसी नेते गायब होते. त्यावेळी महायुतीसाठी एकट्यानं लढाई लढून सत्ता अणण्यास मदत केली. मात्र, आता संधी द्यायच्या वेळी दुर्लक्ष केल्याने भुजबळांची नाराजी असल्याचं कळतंय. एकीकडे भुजबळांची नाराजी असली तरी उद्या विधीमंडळ कामकाजात भुजबळ सहभागी होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी एबीपी माझाला दिली.  


छगन भुजबळ समर्थकांनी नाशिकमध्ये टायर जाळले


राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने समर्थक आक्रमक झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाशिक कार्यालयाबाहेर टायर जाळून अजित पवारांचा निषेध करण्यात आल्याची माहिती आहे. ओबीसी कार्यकर्त्यांकडून राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाबाहेर निषेध व्यक्त करत छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान देण्याची मागणी करण्यात आली.


अजित पवारांनी भाकरी फिरवली


राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित पवार यांनी यावेळी मंत्रिपदाचं वाटप करताना भाकरी फिरवली. एकनाथ शिंदेंच्या सरकारमध्ये मंत्री असलेल्या राष्ट्रवादीच्या काही नेत्यांचा पत्ता कट करण्यात आला. यामध्ये दिलीप वळसे पाटील, धर्मारावबाबा अत्राम, संजय बनसोडे, अनिल पाटील आणि छगन भुजबळ यांच्या नावाचा समावेश आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला एकूण 10 मंत्रिपदं मिळाली आहेत.



इतर बातम्या :


बारामतीत चाणक्य लिहिलेला देवेंद्र फडणवीसांचा बॅनर पेटवला, पोलीस धावले, घटनास्थळी तणाव