मुंबई : उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आता भाजप समोर बंडोबांना थंड करण्याचं सगळ्यात मोठं आव्हान आहे. 288 मतदारसंघात मित्रपक्षांसह भाजपच्या कमळावर तब्बल 164 अधिकृत उमेदवारांनी भाजपच्या बी फॉर्म वर उमेदवारी अर्ज भरला आहे. शिवसेना-भाजपसह राष्ट्रवादी, काँग्रेस आणि इतर पक्षांच्या उमेदवारांनी देखील बंडखोरी केली असून आज अर्ज मागे घेतल्यानंतर सर्व मतदारसंघातील चित्र स्पष्ट होणार आहे.

यामध्ये अनेक उमेदवार आयात केलेले आहेत तर काही ठिकाणी विद्यमान आमदारांना डच्चू देऊन नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. मित्रपक्षांना जागा सोडल्या असल्या तरी त्यापैकीही बहुतांश ठिकाणी उमेदवार भाजपनेच ठरवला आहे. त्यामुळे या सर्व मतदारसंघात स्थानिक पातळीवर असंतोष असून अनेकांनी बंडाचे निशाण फडकवत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेत.

सध्यस्थीती पाहता खरंतर भाजपच्या 'अब की बार 220 पार' या नाऱ्याला बंडोबा मोठा सुरुंग लावू शकतात. त्यामुळे या बंडोबांना शांत करून त्यांचे उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी मनधरणीचे युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. उद्या म्हणजे 7 ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे.  मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सर्व दौरे रद्द करून ते सध्या मुंबईत ठाण मांडून बसलेत. प्रत्येक बंडखोराला हॉटलाईनवर संपर्क साधून आश्वासनांची खैरात दिली जात असल्याची सूत्रांची माहिती आहे. तरीही उमेदवारी मागे घेतली नाही तर महायुतीत यापुढे कुठलंही स्थान नसेल असं मुख्यमंत्र्यांनी याआधीच स्पष्ट केलं आहे.

भाजपने अशा एकूण 114 बंडखोरांची तयार केलेली यादी एबीपी माझाच्या हाती लागली आहे. 27 मतदारसंघात या बंडखोरांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असून सर्वाधिक बंडखोरी कोल्हापूरच्या चंदगड या मतदारसंघात पाहायला मिळतेय. चंदवडच्या जागेवर भाजपचा डोळा होता मात्र या जागी शिवसेनेचा उमेदवार लढत असून याठिकाणी एकूण 9 बंडखोरांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात पाडापाडीचं राजकारण रंगणार आणि त्याचा फटका महायुतीला बसणार अशी चिन्ह दिसतायत. त्यामुळे किती जण निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतात आणि किती बंडखोर भाजपची डोकेदुखी वाढवतात यावरून भाजपचं सत्ता स्थापनेचं गणित ठरणार एवढं निश्चित.

पुण्यात अनेक मतदारसंघात बंडखोरी
पुण्यातील वडगाव शेरी मतदारसंघात भाजपचे जगदीश मुळीक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील टिंगरे यांच्यात लढत होत आहे. मात्र या ठिकाणी शिवसेनेचे नगरसेवक संजय भोसले यांनी बंडखोरी केली आहे. यामुळं मुळीक यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

कसबा पेठ मतदारसंघात भाजपच्या मुक्ता टिळक यांची कॉंग्रेसच्या अरविंद शिंदे यांच्यात लढत होते आहे. मात्र या ही ठिकाणी शिवसेनेचे नगरसेवक विशाल धनवडे यांनी बंडखोरी केली आहे. त्यामुळं भाजपचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या या मतदारसंघात मुक्ता टिळक यांची डोकेदुखी वाढली आहे.

हडपसर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे योगेश टिळेकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे चेतन तुपे यांच्यात लढत होत आहे. मात्र या ठिकाणी शिवसेनेचे गंगाधर बधे यांनी बंडखोरी केलीय. योगेश टिळेकर आणि गंगाधर बधे हे दोघेही माळी समाजाचे नेते आहेत. त्यांच्यातील मतविभागणीचा फायदा चेतन तुपेंना होऊ शकतो.

पुण्यातील खडकवासला विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार भीमराव तापकीर यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिन दोडके निवडणूक लढवतायत. परंतु या ठिकाणी शिवसेनेचे मागील वेळचे उमेदवार रमेश कोंडे यांनी बंडखोरी केलीय. जी तापकीर यांच्यासाठी तापदायक ठरू शकते.

पुण्यातील कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातून कॉंग्रेसचे रमेश बागवे आणि भाजपचे सुनील कांबळे यांच्यात लढत होतेय. मात्र या ठिकाणी कॉंग्रेसचे नगरसेवक सदानंद शेट्टी यांनी बंडखोरी करत बागवेंसमोरच्या अडचणीत वाढ केलीय.

पुण्यातील पर्वती विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून माधुरी मिसाळ तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून अश्वीनी कदम निवडणूक लढवतायत. परंतु या ठिकाणी कॉंग्रेसचे नगरसेवक आबा बागुल यांनी बंडखोरी केलीय.

 चिंचवड विधानसभा मतदारसंघातून भाजपचे लक्ष्मण जगताप यांच्या विरोधात पिंपरी-चिंचवड महापालिकेतील शिवसेनेचे गटनेते राहूल कलाटे यांनी बंडखोरी केलीय. कलाटे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा देखील पाठिंबा आहे.

 सातारा जिल्ह्यातील बंडखोरी  
सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत पुरषोत्तम जाधव हे शिवसेनेचे. त्यांनी लोकसभेला पक्षाकडे तिकीटाची मागणी केली होती. मात्र भाजपचे नरेंद्र पाटील यांना शिवसेनेत प्रवेश देऊन त्यांना उदयनराजे भोसले यांच्या विरोधात निवडणुकीला उतरवले. त्यावेळी पुरुषोत्तम जाधव यांना शांत केले. विधानसभेलाही त्यांना तिकीट डावलल्यामुळे त्यांनी लोकसभेच्या पोटनिवडणुकीत उदयनराजेंच्या विरोधात अपक्ष फॉर्म भरला आहे.

जावली मतदारसंघात शिवेंद्रराजे यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत भाजपच्या तिकीटावर उमेदवारी मिळवली तर भाजपला रामराम ठोकत दिपक पवार यांनी भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादीत प्रवेश केला.

 कराड दक्षिणमध्ये काँग्रेसच्या तिकीटावर पृथ्वीराज चव्हाण हे लढत असून भाजपच्या चिन्हावर अतुल भोसले हे निवडणूक लढत आहेत. काँग्रेसचे विलास काका पाटील उंडाळकर यांचा मुलगा उदयसिंह पाटील उंडाळकर यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवत आहेत.

 कराड उत्तरमध्ये राष्ट्रवादीच्या चिन्हावर बाळासाहेब पाटील हे लढत असून शिवसेनेच्या तिकीटावर धैर्यशिल कदम हे निवडणूक लढवत आहेत. चंद्रकांत पाटील यांनी गेल्या 25 दिवसांपूर्वी मनोज घोरपडे यांना जाहीर सभेत भाजपच तिकीट जाहिर केलं होतं. मात्र धैर्यशिल कदम यांनी राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केल्यामुले मनोज घोरपडे यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.

  माण - खटाव मतदारसंघात राष्ट्रवादीला रामराम ठोकत शिवसेनेत शेखर गोरे हा पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवत आहे. तर जयकुमार गोरे यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवत आहे. हे दोघे सख्खे भाऊ असून युतीची ही राज्यातली एकमेव मैत्रीपूर्व लढत समजली जाते. तर आमच ठरलंय या पॅटनखाली सर्व पक्षातील इच्छुक उमेदवारांनी भाजपचे अनिल देसाई यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. या ठिकाणी राष्ट्रवादीने उमेदवार दिला नाही मात्र राष्ट्रवादीचे सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांनी अपक्ष फॉर्म भरला आहे.

कोरेगाव मतदारसंघात राष्ट्रवादीच्या तिकीटावर शशिकांत शिंदे हे लढत असून भाजपच्या तिकीटावर महेश शिंदे हे निवडणूक लढवत असून या ठिकाणी शिवसेनेचे रणजित भोसले यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

 वाई – खंडाळा मतदारसंघात या ठिकाणी राष्ट्रवादीच्या तिकीटावर मकरंद पाटील हे निवडणूक लढवत असून काँग्रेसला रामराम ठोकून आलेले मदन भोसले यांना भाजपने तिकीट दिले आहे. शिवसेनेचे पुरुषोत्तम जाधव यांनी बंडखोरी करत लोकसभेबरोबर वाई विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

सांगलीतील प्रमुख बंडखोरी लढती

इस्लामपूर-वाळवा मतदारसंघ  

1 ) जयंतराव पाटील -(विद्यमान आमदार )राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी.

2 ) गौरव नायकवडी - शिवसेना

3 ) निशिकांत पाटील - (इस्लामपूर-नगराध्यक्ष) भाजपा बंडखोर

जत मतदारसंघ

1 ) विलासराव जगताप - (विद्यमान आमदार ) भाजपा

2 ) विक्रम सावंत - काँग्रेस

3 ) डॉ रवींद्र आरळी - अपक्ष -भाजपा बंडखोर

शिराळा मतदारसंघ

1 ) शिवाजीराव नाईक - ( विद्यमान आमदार ) भाजपा

2 ) मानसिंगराव नाईक - (माजी आमदार) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

3 ) सम्राट महाडिक - अपक्ष -भाजपा बंडखोर

सांगली मतदार संघ

1) सुधीर गाडगीळ -भाजपा

2 ) पृथ्वीराज पाटील - काँग्रेस

3 ) शिवाजी डोंगरे - अपक्ष ,भाजपा बंडखोर

४) शेखर माने,अपक्ष, शिवसेना बंडखोर.

कोल्हापूर प्रमुख बंडखोरी लढती

1. कागल मतदार संघात मुख्यमंत्री आणि चंद्रकांत पाटील यांच्या जवळचे असलेले समरजित घाटगे यांनी उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आहे.

2. कोल्हापूर उत्तर याठिकाणी सेना-भाजपमध्ये धुसफूस सुरु आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांकडून सेनेचे काम करण्यास नकार

3. शिरोळ मतदार संघात राष्ट्रवादीचे राजेंद्र पाटील येड्रावकर यांच्याकडून बंडखोरी. स्वाभिमानी शेतकरी संघटनेला जागा गेल्याने अपक्ष रिंगणात

मराठवाड्यात भाजप शिवसेनेमध्ये बंडखोरांचा उत
मराठवाड्यात बंडखोरांना थंड करण्याचे शर्थीचे प्रयत्न सर्वच पक्षाकडून होत असून बंडाची सर्वाधिक लागण झालेल्या भाजप शिवसेनेला बंडखोरांनी चांगलेच आव्हान दिलंय. मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यात बंडखोरीचा उत आला आहे. पक्षाच्या अधिकृत उमेदवाराची डोकेदुखी टाळण्याचे प्रयत्न सुरू आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील नऊ विधानसभा क्षेत्रापैकी पाच विधासभा मतदारसंघात बंडखोरांनी निशाण फडकवलंय. यात औरंगाबादच्या फुलंब्री विधासभा मतदारसंघातून उभे राहिलेल्या विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना शिवसेना जिल्हा परिषद सदस्याने आपला उमेदवारी अर्ज भरून आव्हान दिलंय. त्यांच्या विरोधात शिवसेनेच्या रमेश पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय.  या शिवाय नुकताच शिवसेनेत प्रवेश केलेल्या सिल्लोड मतदारसंघात उभे राहिलेल्या अब्दुल सत्तार यांच्याविरोधात भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष सुनील मिरकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय.

हीच स्थिती बीड, नांदेड, लातूर परभणी आणि जालना जिल्ह्याची असून लातूर जिल्ह्यातील बहुचर्चित औसा मतदारसंघात मुख्यमंत्त्र्यांचे स्वीय सहायक राहिलेल्या अभिमन्यू पवार यांच्या विरोधात शिवसेनेचे माजी आमदार दिनकर माने, भाजपचे बजरंग जाधव यांच्यासह आणखी एका उमेदवाराने एकत्रित अर्ज भरलाय. या बंडखोरांना संभाजी पाटील निलंगेकरांचे बंधू अरविंद पाटील निलंगेकरांनी पाठिंबा दिलाय.

बीडमध्ये देखील शिवसेनेत गेलेले माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या विरोधात भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र म्हस्के यांनी उमेदवारी अर्ज भरलाय.

परभणी विधानसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेसमध्ये बंडखोरी बघायला मिळतेय. अधिकृत उमेदवार रविराज देशमुख यांनी आपला उमेदवारी अर्ज भरलेला असताना त्यांच्या पाठोपाठ स्थानिक काँग्रेस नेते सुरेश नागरे यांनीही उमेदवारी अर्ज भरलाय.

उत्तर महाराष्ट्रमध्ये सध्याची स्थिती, माघारीनंतर चित्र अधिक स्पष्ट होणार

नाशिक जिल्हा

नाशिक पूर्व
भाजप आमदार बाळासाहेब सानप यांचे भाजपाने तिकीट कापले आणि मनसेचे राहुल ढिकले यांना उमेदवारी दिली. त्या विरोधात बाळासाहेब सानप यांनी दंड थोपटले असून राष्ट्रवादीकडून उमेदवारी दिली आहे. सानप यांच्यावर पक्षातील पदाधिकारी नाराज असले तरी त्यांचं कार्यकर्त्यांचं जाळं आहे. त्यामुळे त्याचा फटका राहुल ढिकले यांना काही प्रमाणात बसू शकतो.

नाशिक पश्चिम
नाशिक पश्चिमची जागा भाजपाला सुटल्याने शिवसेनेनं बंडखोरी केलीय. भाजपच्या विद्यमान आमदार सीमा हिरे यांच्याविरोधात शिवसेनेच्या सुधाकर बडगुजर, मामा ठाकरे आणि विलास शिंदे या तिघांनी अपक्ष अर्ज भरला आहे. यातील दोघे अर्ज माघारी घेणार असून विलास शिंदे उमेदवार राहू शकतात. तर दुसरीकडे शिवसेनेचे नगरसेवक दिलीप दातीर यांनी मनसेकडून उमेदवारी घेतली आहे. त्यामुळे युतीच्या मतांचे विभाजन होणार आहे. त्याचा फायदा आघाडीच्या उमेदवाराला होवू शकतो. आघाडीचे अपूर्व हिरे यांना राष्ट्रवादीची उमेदवारी मिळाली आहे तर डॉ डी एल कराड हे माकपचे उमेदवार आहेत. त्यामुळे आघाडीसमोरची मत विभाजनाचा प्रश्न आहे. म्हणूनच कोण माघार घेतो यावर युती आघाडीच्या विजयाचे गणित अवलंबून आहे.

नांदगाव
नांदगाव विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे ग्रामीण जिल्हा प्रमुख सुहास कांदे यांच्या विरोधात भाजपच्या जिल्हा परिषद बांधकाम सभापती मनीषा पवार यांनी बंडखोरी केलीय. त्यांनी माघारी घेतली नाही तर शिवसेनेला लढाई जड जाईल. इथून छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ हॅटट्रिकच्या तयारीत आहेत.

देवळाली
घोलप घराण्याचे वर्चस्व आणि शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून देवळली मतदारसंघाकडे बघितले जाते. मात्र भाजपच्या नगरसेविका सरोज अहिरे यांनी बंडखोरी करत राष्ट्रवादी कडून उमेदवारी घेतली आहे. त्यामुळे विद्यमान आमदार योगेश घोलप यांचा सोपा वाटणारा विजय अवघड झालाय.

धुळे जिल्हा

धुळे शहर विधानसभा मतदार संघातून भाजपच्या कार्यकर्त्या डॉ.माधुरी बाफना यांनी धुळे शहर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी दाखल केलीय. धुळे शहर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे हिलाल माळी हे उमेदवार आहेत.

साक्री विधानसभा मतदारसंघातून भाजपचे कार्यकर्ते तुळशीराम गावित, त्यांच्या पत्नी मंजुळा गावित यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केलीय. साक्री मतदारसंघात भाजपचे मोहन सूर्यवंशी हे उमेदवार आहेत.

शिंदखेडा विधानसभा मतदारसंघात भाजपचे जयकुमार रावल हे उमेदवार आहेत त्यांच्याविरोधात शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करून युतीच्या धर्म खुंटीला टांगला आहे.

शिरपूर विधानसभा मतदारसंघात भाजपचे काशीराम पावरा हे उमेदवार आहेत. त्यांच्या विरोधात भाजपचे डॉ.जितेंद्र ठाकूर यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देत अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे.

जळगाव जिल्हा
मुक्ताईनगर

सेना आणि भाजपा मध्ये युती झालेली असली तरी मुक्ताईनगर मतदार संघात मात्र सेनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बंडखोरी करीत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून युती धर्माला हरताळ फसल्याच पाहायला मिळालं आहे. गेली तीस वर्षे आपण या मतदारसंघात काम करीत आहोत. मात्र शिवसेनेचे नेते आपल्या उमेदवारीसाठी प्रयत्न करीत नसल्याने आपल्याला कोणतंही विकास काम करताना अडचणी येत आहेत. नाईलाज म्हणून आपल्याला अपक्ष उभे रहावे लागत असल्याचे पाटील यांनी म्हटलं आहे. चंद्रकांत पाटील यांच्या उमेदवारीमुळे सेनेच युतीला होणार मोठं मतदान हे पाटील यांच्याकडे जाण्याची शक्यता पाहता युतीच्या उमेदवार रोहिणी खडसे यांच्या दृष्टीने डोके दुःखी ठरणार आहे.

नंदुरबार जिल्हा
नंदुरबार विधानसभा मतदारसंघ भाजपाचे माजी आमदार उदेसिंग पाडवी यांनी बंडखोरी केली आहे. उदेसिंग पाडवी हे शहादा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार होते. पक्षाने त्यांची उमेदवारी नाकारल्याने त्यांनी नंदुरबार विधानसभा मतदारसंघात काँग्रेसची उमेदवारी  घेत विद्यमान आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या समोर मोठं आव्हान उभं केलं आहे. पाडवी यांचा नंदुरबार विधानसभा मतदारसंघात मोठा जनसंपर्क आहे त्यासोबत शहादा तालुक्यातील चार जिल्हा परिषद गट मतदारसंघाला जोडले असल्याने त्याचा फायदा उदेसिंग पाडवी यांना होईल. विजयकुमार गावित यांच्यासाठी एकतर्फी असणारी ही निवडणूक उदेसिंग पाडवी यांचा उमेदवारीमुळे रंगतदार झाली आहे

अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघ
अक्कलकुवा विधानसभा मतदार संघातून भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष नागेश पाडवी यांनी सेनेच्या उमेदवारांसमोर बंडखोरी केली आहे. नागेश पाडवी यांचे वडील स्वर्गीय दिलवरसिंग पाडवी या मतदारसंघाचे तीन वेळा आमदार होते.  नागेश पाडवी यांचा मोठा जनसंपर्क, दिलवरसिंग यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांचा एक मोठा गट या मतदारसंघात असल्याने सेनेच्या उमेदवाराला फटका बसू शकतो. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत नागेश पाडवी हे तिसऱ्या क्रमांकावर होते, त्यांना ते 33हजार 345 मते मिळाली होती.

अहमदनगर जिल्हा
कोपरगाव
कोपरगाव मतदारसंघात भाजपचे विजय वहाडणे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. माजी प्रदेशाध्यक्ष सूर्यभान वाहाडणे यांचे ते चिरंजीव असून नगर पालिका निवडणुकीत बंडखोरी करत त्यांनी नगराध्यक्षपद मिळवलंय. विधानसभेला आता पुन्हा अर्ज भरला असून वाहाडणे आणि अपक्ष उमेदवार राजेश परजने यांच्या उमेदवारीमुळे काळे आणि कोल्हे यांच्या संघर्षाच्या लढाईत चुरस वाढणार आहे. चौरंगी लढत झाल्यास भाजप विद्यमान आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या अडचणीत वाढ होईल हे मात्र नक्की.

पारनेर 
या मतदार संघात राष्ट्रवादीकडून माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुजित झावरे इच्छुक उमेदवार होते. मात्र राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या निलेश लंके यांना तिकीट मिळाल्याने सुजित झावरे यांनी अपक्ष अर्ज दाखक केलाय. सुजित झावरे 2 निवडणुकांमध्ये पराभूत झाले आहेत. त्यामुळं त्यांचा फारसा परिणाम होणार नाही.  तर दुसरीकडे शिवसेनेकडून जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी देखील अपक्ष अर्ज भरलाय. शिवसेनेकडून विद्यमान आमदार विजय औटी यांना उमेदवारी मिळाली. विजय औटी 3 टर्म आमदार आहेत.
मात्र संदेश कार्ले यांचा नगर गटात चांगले वर्चस्व आहे. त्यामुळे शिवसेनेला फटका बसू शकतो.

अहमदनगर

नगर मतदार संघात राष्ट्रवादीकडून संग्राम जगताप यांनी उमेदवारी मिळली आहे. राष्ट्रवादी युवक प्रदेश उपाध्यक्ष किरण काळे यांनी पक्षाला राम राम ठोकून वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश करत उमेदवारी अर्ज दाखल केलाय. मात्र त्याचा या निवडणुकीत फारसा परिणाम होणार नाही.

श्रीगोंदा 
माजी आमदार शिवाजीराव नागवडे यांची सून अनुराधा नागवडे या भाजपकडून इच्छुक होत्या. अनुराधा नागवडे काँग्रेस पक्षात कार्यरत असूनही भाजपकडून प्रयत्न सुरू होता.
मात्र भाजपकडून माजी मंत्री बबनराव पाचपुते यांना उमेदवारी मिळाल्याने अनुराधा नागवडे यांनी अपक्ष अर्ज दाखल केलाय. नागवडे यांनी अपक्ष अर्ज भरला असला तरी पाचपुते यांना पाठिंबा दिलाय. त्यामुळे नागवडे आपला अर्ज मागे घेण्याची शक्यता आहे. मात्र अर्ज मागे नाही घेतला तर त्याचा फटका भाजप उमेदवार बबनराव पाचपुते यांना बसू शकतो.

सोलापुरात सर्वच मतदारसंघात बंडखोरी

सोलापुर मध्य विधानसभा मतदारसंघात शिवसेनेतर्फे नुकतंच काँग्रेसमधून सेनेत प्रवेश केलेल्या दिलीप माने यांना तिकीट देण्यात आलंय. त्यामुळे सेनेचे जिल्हा प्रमुख दिलीप माने यांनी बंड करत अपक्ष अर्ज सादर केला आहे.

पंढरपुरात काँग्रेसमधून राष्ट्रवादीत गेलेल्या भारत भालके यांच्या विरोधात काँग्रेसने शिवाजीराव काळुंगे यांना उमेदवारी दिलीय. त्यामुळे शहर मध्य विधानसभेत प्रणिती शिंदे यांच्यावर दबाव टाकण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष जुबेर बागवान यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

बार्शीत युतीचे उमेदवार असलेल्या दिलीप सोपल यांनी राष्ट्रवादीतून सेनेत प्रवेश करत तिकीट मिळवलं. मात्र पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या राजेंद्र राऊत यांनी युतीचा धर्म न पाळता बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

करमाळा मतदार संघातही शिवसेनेत बंडखोरीचे चित्र आहे. विद्यमान आमदार नारायण पाटील यांचा पत्ता कट झाल्याने त्यांनी अपक्ष अर्ज सादर केला आहे. राष्ट्रवादीतून सेनेत प्रवेश करुन रश्मी बागल यांनी तिकीट मिळवलं आहे.  तर करमाळ्यातच राष्ट्रवादीतर्फे संजय पाटील घाटणेकर यांनी तिकीट दिल्याने राष्ट्रवादीचे संजय शिंदे आणि माजी आमदार जयवंतराव पाटील यांनी अपक्ष अर्ज भरला आहे.

पंढरपुरात महायुतीचे उमेदवार सुधाकरपंत परिचारक यांच्याविरोधात सेनेच्या शैला गोडसे, समाधान अवताडे यांनी अर्ज भरला आहे.

माढ्यात युतीचे उमेदवार संजय कोकाटे यांच्याविरोधात भाजपचे शिवाजी कांबळे मैदानात उतरणार आहेत.

माळशिरसमध्ये भाजपतर्फे नवख्या राम सातपुते यांना उमेदवारी दिल्याने नाराज उत्तमराव जानकर यांनी हातावर घड्याळ बांधण्याचा निर्णय घेत उमेदवारी दाखल केलीय.

मोहोळ मतदारसंघात राष्ट्रवादीतर्फे उमेदवार असलेल्या यशवंत माने यांच्याविरोधात आमदार रमेश कदम  तर शिवसेनेचे उमेदवार नागनाथ क्षीरसागर यांच्याविरोधात मनोज शेजवाल मैदानात उतरले आहेत.

सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे मौलाली सय्यद (बाबा मिस्त्री) यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अप्पाराव कोरे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करत बंड पुकारलंय.

अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार सचिन कल्याणशेट्टी यांच्याविरोधात भाजपच्या नाराज गटातील बाळासाहेब मोरे रिंगणात आहेत.

सांगोल्यात ज्येष्ठ आमदार गणपतराव देशमुख यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेत नातू अनिकेत याला रिंगणात उतरवलं, त्यामुळे  डावललेल्या भाऊसाहेब रुपनर यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय. तर आतापर्यंत शेकापला पाठिंबा देणाऱ्या राष्ट्रवादीचे दीपक साळुंखे यांनी सांगोल्यातून अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे.

विदर्भातील महत्वाच्या बंडखोरी

नागपूर जिल्हा

1) उत्तर नागपूरमध्ये काँग्रेसचे उमेदवार नितीन राऊत यांच्याविरोधात काँग्रेसचे मनोज सांगोळे अपक्ष उमेदवार म्हणून बंडखोरी

2) दक्षिण नागपूरमध्ये भाजपचे उमेदवार मोहन मते यांच्याविरोधात शिवसेनेचे किशोर कुमेरिया अपक्ष उमेदवार म्हणून बंडखोर

3) पूर्व नागपूरमध्ये काँग्रेसचे उमेदवार पुरुषोत्तम हजारे यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे दूनेश्वर पेठे यांची अपक्ष म्हणून बंडखोरी

4) रामटेकमध्ये भाजपचे उमेदवार आणि विद्यमान आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांच्यासमोर शिवसेनेचे माजी आमदार आशिष जयस्वाल हे बंडखोर

गोंदिया जिल्हा

1) गोंदियामध्ये भाजप उमेदवार गोपाल अग्रवाल यांच्या समोर भाजपच्या माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांची अपक्ष म्हणून बंडखोरी

भंडारा जिल्हा

1) तुमसरमध्ये भाजप उमेदवार प्रदीप पडोळे यांच्या समोर भाजपचे विद्यमान आमदार चरण वाघमारे यांची अपक्ष म्हणून बंडखोरी

वर्धा जिल्हा

1) हिंगणघाटमध्ये भाजप उमेदवार आणि विद्यमान आमदार समीर कुणावार यांच्या विरोधात शिवसेनेचे अशोक शिंदे यांची अपक्ष म्हणून बंडखोरी

2) हिंगणघाटमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राजू तिमांडे यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे सुधीर कोठारी यांची अपक्ष म्हणून बंडखोरी

चंद्रपूर जिल्हा

1) चिमूरमध्ये भाजपचे विद्यमान आमदार बंटी भांगडीया यांच्या विरोधात भाजपचे धनराज मुंगळे यांची अपक्ष म्हणून बंडखोरी

2) वरोरामध्ये काँग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकर यांच्या समोर काँग्रेसचे विजय देवतळे यांची अपक्ष म्हणून बंडखोरी

अमरावती जिल्हा

1) दर्यापूर मध्ये भाजप उमेदवार व विद्यमान आमदार रमेश बुंदीले यांच्या समोर भाजपच्या सीमा सावळे यांची अपक्ष म्हणून बंडखोरी

अकोला जिल्हा

1) अकोला पूर्व मध्ये वंचित बहुजन आघाडी चे उमेदवार हरिदास भदे यांच्या समोर वंचित बहुजन आघाडी चे नेते व माजी मंत्री दशरथ भांडे यांची अपक्ष उमेदवार म्हणून बंडखोरी

2) बाळापूर मध्ये वंचितचे उमेदवार डॉ धैर्यवान पुंडकर यांच्या समोर विद्यमान आमदार आणि वंचितचे नेते बळीराम शिरस्कर यांची अपक्ष म्हणून बंडखोरी

वाशीम जिल्हा

1) रिसोडमध्ये काँग्रेस उमेदवार आणि विद्यमान आमदार यांच्या विरोधात काँग्रेसचेच माजी खासदार अनंतराव देशमुख हे बंडखोरी करून अपक्ष म्हणून उभे

2) रिसोड मध्ये शिवसेनेचे उमेदवार विश्वनाथ सानप यांच्या समोर भाजप नेते विजय जाधव यांची अपक्ष म्हणून बंडखोरी

3) वाशीम मध्ये भाजपचे उमेदवार लखन मलिक यांच्या विरोधात शिवसेनेचे नेते शशिकांत पेंढारकर यांची अपक्ष म्हणून बंडखोरी

बुलडाणा जिल्हा

1) बुलडाणा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार संजय गायकवाड यांच्या समोर शिवसेनेचे माजी नेते आणि सध्या वंचित मध्ये प्रवेश केलेल्या विजयराज शिंदे यांची बंडखोरी

मानखुर्दमध्ये मुख्यमंत्री आणि चंद्रकांत पाटलांची शिष्टाई फळाला

मानखुर्द - शिवाजी नगर मुख्यमंत्री आणि चंद्रकांत पाटलांची शिष्टाई फळाला आली आहे.  शिवसेनेचे उमेदवार विठ्ठल लोकरे यांच्याविरोधात बंडखोरी करणाऱ्या रिपाई मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे उमेदवारी अर्ज घेणार मागे घेणार आहेत.