मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शिवाजीनगर मानखुर्दचे उमेदवार नवाब मलिक यांच्या विरोधात करण्यात आलेल्या याचिकेवर मुंबई हायकोर्टात सुनावणी पार पडली. मुंबई हायकोर्टानं नवाब मलिक यांचा जामीन रद्द करण्याबाबत दाखल करण्यात आलेली याचिका प्रथमदर्शनी तथ्यहीन असल्याचं निरीक्षण नोंदवलं आहे. सॅमसन अशोक पाथरे या व्यक्तीनं नवाब मलिक आणि ईडीला प्रतिवादी करत याचिका दाखल केली आहे.
मुंबई हायकोर्टात काय घडलं?
नवाब मलिक यांचा जामीन रद्द करण्याबाबतची याचिका प्रथमदर्शनी तथ्यहीन असल्याचं निरीक्षण मुंबई हायकोर्टानं नोंदवलं. नवाब मलिकांचा जामीन रद्द करण्याची मागणी करणा-या याचिकाकर्त्यांच्या भूमिकेवर सवाल देखील उपस्थित करण्यात आले. या प्रकरणी दोन आठवड्यांत याचिकेत अधिक पुरावे सादर करण्याचे निर्देश हायकोर्टाकडून जारी करण्यात आले आहेत. या याचिकेवर न्यायमूर्ती मनीष पितळे यांच्यासमोर सुनावणी झाली.
सर्वोच्च न्यायालयाने मलिक यांना जामीन देताना दिलेल्या शर्तीचे उल्लंघन केल्याचा आरोप सॅमसन पाथरे या व्यक्तीनं केला होता. त्यानं दाखल केलेल्या याचिकेत नवाब मलिकांसह ईडीलाही प्रतिवादी करण्यात आलं होतं. नवाब मलिक यांनी पाथरे या व्यक्तीच्या याचिकेला विरोध केला होता. 9 डिसेंबर 2024 रोजी नवाब मलिकांच्या मूळ जामीनाच्या अर्जासोबत यावर याचिकेवर सुनावणी होणार आहे.
नवाब मलिक मानखुर्द शिवाजीनगरमध्ये रिंगणात
नवाब मलिक यांनी यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मतदारसंघ बदलला आहे. गेल्या निवडणुकीत ते अणूशक्तीनगर मतदारसंघातून विजयी झाले होते. यावेळी नवाब मलिक यांनी मतदारसंघ बदलला आहे. नवाब मलिक यांनी अणूशक्तीनगर मतदारसंघातून त्यांची कन्या सना मलिक यांना उमेदवारी दिली आहे. मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसनं नवाब मलिक यांना उमेदवारी दिली आहे. तिथं त्यांच्यासमोर समाजवादी पार्टीच्या अबू आझमी यांचं आव्हान आहे. तर, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून या मतदारसंघात सुरेश उर्फ बुलेट पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
मी राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार, नवाब मलिक यांची भूमिका
नवाब मलिक यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली. महायुतीत भाजप आणि शिवसेनेनं नवाब मलिक यांच्या उमेदवारीला विरोध दर्शवला. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं तिथं सुरेश पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. नवाब मलिक यांनी देखील ते महायुतीचे उमेदवार नसून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असल्याचं म्हटलं.
दरम्यान, सॅमसन पाथरेच्या याचिकेवर पुढील सुनावणी 9 डिसेंबरला होणार असल्यानं नवाब मलिक यांना दिलासा मिळाला आहे.
इतर बातम्या :