BMC Election 2022 : मुंबई महापालिका निवडणुकीचे बिगूल वाजले आहे.  आरक्षण सोडतीनंतर गेली अनेक वर्ष निवडणुकीची वाट पाहत असलेले शिवसेना नेते,इच्छुक उमेदवार, माजी नगरसेवक सज्ज झाले आहेत. कार्यक्रमाचा धडाका, वरिष्ठ नेत्यांसोबत लॅाबिंग आणि वॅार्डांवर आपला असलेला हक्क दाखवण्याची चढाओढ देखील सुरु झाल्याचे चित्र आहे. 


स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात नाराजी उफाळण्याची शक्यता


मुंबई महानगर पालिकेच्या प्रभाग सोडतीने सर्वच राजकीय पक्षातील प्रस्थापित दिग्गज माजी नगरसेवकांना गारद केले आहे.त्यात शिवसेनेच्या ही काही नगरसेवकांना आणि इच्छुकांना झटका बसला आहे.त्यामुळे आता त्यांना नव्याने प्रभाग शोधताना स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात नाराजी उफाळण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रभाग सोडतीचा फटका बसलेल्या माजी नगरसेवकांची सोय लावताना राजकीय पक्षांची दमछाक होवू शकते. 


त्यामुळे इच्छुकांनी मोर्चेबांधणीला सुरुवात 


236 प्रभागांमध्ये 50 टक्के म्हणजे 118 प्रभागांमध्ये महिला आरक्षण लागू झाले आहे. या आरक्षणाने प्रभागांची उलथापालथ झाली असून शिवसेना माजी नगरसेवक आणि इच्छुकांना  नव्याने मोर्चेबांधणी करावी लागणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केल्याचे चित्र सध्या मुंबईत पाहायला मिळते अनेक कार्यक्रम इच्छुक अन तर्फे घेतले जात आहेत तसेच आपल्या विभागातील मोठ्या नेत्यांना बोलावून आपल्या पदरी नगरसेवक तिकीट कशी मिळेल यासाठी प्रयत्न होत असल्याचे चित्र सध्या आहे.


या दिग्गजांना शोधावा लागणार पर्याय


आशिष चेंबुरकर, समाधान सरवणकर, अमेय घोले, अनिल पाटणकर आदींना प्रभाग आरक्षणामुळे प्रभागाला मुकावे लागले आहे. त्यामुळे त्यांना आता पर्याय शोधावा लागणार आहे. दुसऱ्या प्रभागाचा अभ्यास करायला या मंडळींनी सुरुवात केली याची देखील माहिती मिळतेय.


तसेच आम्हाला नाही तर यांना द्या तिकीट


आरक्षण सोडतीमुळे शिवसेनेतील अनेक माजी नगरसेवक आणि इच्छुकांच्या इच्छा अपेक्षांवर पाणी सांडलं आहे. प्रभागात आरक्षण पडल्यानं आता इच्छुक आणि माजी नगरसेवक मंडळी पक्षांतर्गत लॉबिंग करण्यासाठी सरसावली आहेत. आम्हाला या प्रभागात तिकीट मिळालं नाही तर आमच्या मर्जीतल्या व्यक्तीला तिकीट मिळावं यासाठी देखील प्रयत्न करत असल्याची चर्चा जोरदार सुरू आहे. त्यामध्ये काही माजी नगरसेवक आपल्या मुलीला, पत्नीला किंवा सुनेला उमेदवारी मिळवण्यासाठी धडपड करत आहेत.


मुंबईत कामाचा सपाटा


आगामी मुंबई महापालिका निवडणूक ही फार प्रतिष्ठेची असणार आहे. या निवडणुकीसाठी प्रत्येक पक्ष हा कामाला लागलेला आहे. त्यामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई महापालिकेत सत्तेत असलेल्या शिवसेनेने ही कंबर कसली आहे. शिवसेना नेते आणि राज्याचे मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबईत अनेक लोकोपयोगी कामांचं शुभारंभ या काही महिन्यात केले आहे. तर दुसरीकडे मुंबई महापालिकेतील शिवसेनेच्या नगरसेवकांनी आपल्या प्रत्येक वॉर्डमध्ये नवीन नवीन संकल्पना राबवत, आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार गार्डन्स, विविध ठिकाणी सुशोभीकरण आणि अनेक प्रकारच्या सुविधा केंद्र हे उभारलेले आहेत. एकंदरीत मुंबईत अनेक प्रकारची काम करण्यास शिवसेनेने आता जोर धरल्याचे दिसत आहे. त्यामध्ये मुंबई वंडरलँड, धारावी सुविधा केंद्र, सी व्ह्यू स्पॉट अशा अनेक नवीन संकल्पना राबवल्या आहेत.


कुणाला तिकिट मिळणार, कुणाचा पत्ता कट होणार?


आदित्य ठाकरे विविध विकासकामांनी मुंबईचा चेहरा बदलण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचप्रमाणे शिवसेनेच्या उमेदवारांची समीकरणंही बदलणार आहेत. विभागवार बैठकीतच नगरसेवकांचं एकप्रकारे प्रगती पुस्तकच तपासलं गेलंय, त्यामुळे वशिलेबाजी, आमदारांचा मुलगा किंवा नेत्याच्या मुलांच्या सेटिंग यंदा चालणार नसल्याचं बोललं जातंय. शिवसेनेच्या सेनापतींनी आदेश सोडले आहेत सैन्य निवडणुकीसाठी सज्ज झाले आहेत, रणनीती आखली जातेय. या रणनीतीनं शिवसेनेचा मुंबई पॅटर्न यशस्वी झाला तर आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली संपुर्ण महाराष्ट्राभर हा पॅटर्न वापरला जाणार आहे


यंदा मुंबई महापालिकेची निवडणूक ही मोठी चुरशीची आहे. त्यामुळे प्रभागात ज्याची ताकद जास्त आहे आणि सहज निवडून येतील, अशा उमेदवारांना शिवसेनेकडून तिकीट दिले जाणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामध्ये युवा सेनेतील अनेकांना संधी दिली जाणार आहे