मुंबई : मुंबई महापालिकेसाठी शरद पवार यांनी रणशिंग फुंकलंय. आगामी महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सूत्र हातात घेतली आहेत. शरद पवार स्वत: मुंबईत फिरणार असून पक्षाला वेळ देणार आहेत  कोणता पक्ष सोबत येईल, नाही येईल याचा विचार न करता कार्यकर्त्यांना कामाला लागा, असं सूचक वक्तव्य देखील शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या बैठकीत केलंय.


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत आज मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक यशवंतराव चव्हाण सेंटर येथे घेण्यात आली. या  बैठकीत  कार्यकर्त्यांना मुंबई महापालिकेसाठी तयारी करण्याचे आदेश दिले आहेत.


शरद पवार म्हणाले,  राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणीची आणि मुंबई विभागीय कार्यकारिणीची आढावा बैठक अनुक्रमे काल आणि आज आयोजित करण्यात आली. अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपाली मते दोन्ही दिवस झालेल्या बैठकीत मांडली. यापुढे संघटना वाढवून ती बळकट करायची आणि शेवटच्या कार्यकर्त्याला शक्ती देऊन त्याची प्रतिष्ठा कशी राखली जाईल, हा प्रयत्न करण्याचे काम आपल्याला करायचे आहे.


मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जवळ आली आहे. मुंबईतील सर्व जिल्हाध्यक्ष, कार्याध्यक्ष यांनी निवडणुकीच्या तयारीला लागावे. या निवडणुकीत पक्षाचे वरिष्ठ नेते वेळ देतीलच, त्यासोबत मी देखील वेळ देईन. मुंबईतील पदाधिकाऱ्यांनी मला कुठल्या वॉर्डमध्ये न्यायचे हे ठरवावे, त्याठिकाणी यायला मी तयार आहे, असेही शरद पवार म्हणाले. 


कार्याध्यक्ष राखी जाधव आणि कार्याध्यक्ष नरेंद्र राणे यांना निवडणुकीचा आराखडा तयार करावा अशी माझी सूचना आहे. मुंबई महानगरपालिकेमध्ये तुमच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसला आपला झेंडा फडकाविण्याची संधी आहे. त्यामुळे कुणी सोबत असो नसो तयारीला लागा, असे आदेश शरद पवारांनी दिले आहेत.


मुंबईत आपला पक्ष वाढविण्यासाठी अनेक वर्षांपासून आपण प्रयत्न करतोय. पक्षनिष्ठा ठेवून काम करणारे बोरिवलीपासून कुलाब्यापर्यंत प्रयत्न करत आहेत. राजकारणाच्या दृष्टीने महाराष्ट्रात मुंबई शहर हे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे जयंत पाटील म्हणाले.