मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं प्रभाग क्रमांक 194 मधून उमेदवारी न मिळाल्यानं संतोष धुरी यांनी भाजपची वाट धरली आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या जागा वाटपात संतोष धुरी इच्छुक असलेला वॉर्ड क्रमांक 194 उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे गेला आहे. यामुळं नाराज असलेल्या संतोष धुरी यांनी काही वेळापूर्वी मंत्री नितेश राणे यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. आता उद्या संतोष धुरी भाजप प्रवेश करणार आहेत. ऐन मनपा निवडणुकीत मनसेला मोठा धक्का बसला आहे.
प्रभाग क्रमांक 194 मधून संतोष धुरी इच्छुक होते. मात्र, 194 वॉर्ड ठाकरेंच्या शिवसेनेकडे गेला, या ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेकडून निशिकांत शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली होती. यामुळं संतोष धुरी नाराज झाले होते. भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी संतोष धुरी यांच्या नाराजीचा फायदा घेत त्यांना भाजपकडे आणण्यात यश मिळवलं आहे. नितेश राणे यांनी संतोष धुरी यांची देवेंद्र फडणवीस यांची भेट घडवून आणत ठाकरे बंधूंना मोठा धक्का दिला आहे.
संतोष धुरी भाजपमध्ये प्रवेश करणार
मनसेत नाराज असलेल्या संतोष धुरी यांनी अखेर भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. संतोष धुरी यांच्या प्रवेशाच्या माध्यमातून भाजपनं मनसेला मोठा धक्का दिला आहे. वॉर्ड क्रमांक 194 मधून निवडणूक लढवण्यासाठी संतोष धुरी इच्छुक होते. मात्र, ही जागा ठाकरेंच्या शिवसेनेकडे गेली. ठाकरेंच्या शिवसेनेनं निशिकांत शिंदे यांना उमेदवारी दिली. इथं त्यांचा सामना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे समाधान सरवणकर रिंगणात आहेत.
संतोष धुरी कोण आहेत?
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत संतोष धुरी हे संदीप देशपांडे यांचे निकटवर्तीय मानले जायचे. त्यांच्याकडे वरळीचं विभागध्यक्ष हे पद होतं. संतोष धुरी हे मनसेमधून इच्छुक उमेदवार होते. पण 194 वार्ड हा ठाकरेंच्या शिवसेनेला गेल्याने धुरी यांना उमेदवारी पासून डावलले होते. आज त्यांनी मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थित भेट घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थित संतोष धुरी यांचा प्रवेश निश्चित झालेला आहे. उद्या भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत संतोष धुरी भाजपमध्ये प्रवेश करतील.
दरम्यान, भाजप आणि शिवसेना युती करत मुंबईत महापालिका निवडणूक लढवत आहेत. त्यांच्यासमोर उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंच्या मनसेचं आव्हान आहे. काँग्रेस देखील स्वतंत्र रिंगणात आहेत. भाजप 135 जागा लढतेय तर शिवसेना 90 जागा लढतेय.