BMC Election 2026: मुंबई महापालिका निवडणुकीच्या (BMC Election 2026) पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या जवळ जाण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत. याच पार्श्वभूमीवर आज मुंबईतील सिल्व्हर ओक निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या (NCP Sharad Pawar Faction) मुंबई प्रदेशची अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडत आहे.

Continues below advertisement

ही बैठक राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत होत असून, आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीसोबत लढताना पक्षाला किती जागा मिळायला हव्यात, याबाबतचा प्रस्ताव मुंबई अध्यक्ष राखी जाधव मांडणार आहेत. रविवारी महाविकास आघाडीची संयुक्त बैठक होणार असल्याने, त्याआधीची ही बैठक राजकीयदृष्ट्या निर्णायक मानली जात आहे.

BMC Election 2026: 22 जागांचा प्रस्ताव तयार, पण आकडा वाढण्याची शक्यता

सूत्रांच्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून 22 जागांचा प्रस्ताव सध्या तयार करण्यात आला आहे. मात्र, पक्षातील काही नेत्यांकडून 25 ते 30 नगरसेवक निवडून आणण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, त्यानुसार जागांची मागणी वाढण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. काही नेत्यांकडून तर 50 जागांपर्यंतची मागणी होऊ शकते, असेही संकेत दिले जात आहेत. तथापि, लोकसभा निवडणुकीप्रमाणेच कमी जागा लढवून अधिक स्ट्राइक रेट ठेवण्याचा पक्षाचा मानस असल्याचे समजते. 

Continues below advertisement

BMC Election 2026: ठाकरे बंधूंना पसंती, काँग्रेसपासून अंतर?

बुधवारी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी मुंबई पातळीवर बैठक घेऊन स्थानिक नेत्यांचा कल जाणून घेतला. या बैठकीत मुंबईतील बहुतांश नेत्यांनी काँग्रेससोबत जाण्याऐवजी मनसे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसह निवडणूक लढवावी, अशी स्पष्ट भूमिका मांडल्याचे पक्षातील सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. दोन दिवसांपूर्वी पार पडलेल्या पक्षाच्या बैठकीतही कार्यकर्त्यांकडून ठाकरे बंधूंसोबत जाण्याची जोरदार मागणी करण्यात आली होती. मुंबई युथ विंगचे अध्यक्ष अमोल मातेले यांनीही याबाबत माहिती देताना सांगितले की, काँग्रेसकडून मुंबईतील युतीबाबत विचारणा सुरू आहे, मात्र पक्षातील नेत्यांचा कल हा उद्धवसेना–मनसेसोबत जाण्याकडे अधिक आहे.

BMC Election 2026: 2017 चा अनुभव आणि पुढील लक्ष्य

2017 च्या मुंबई महापालिका निवडणुकीत एकसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचे 9 नगरसेवक निवडून आले होते. सध्या विशेषतः मुंबईच्या पूर्व उपनगरात राष्ट्रवादीची काहीशी ताकद असल्याचे पक्षाचे म्हणणे आहे. याच बळावर आगामी निवडणुकीत किमान 25 ते 30 नगरसेवक निवडून आणण्याचे लक्ष्य शरद पवार गटाने ठेवले आहे. आजच्या बैठकीत आगामी महापालिका निवडणुकीची रणनीती, संघटनात्मक मजबुती, स्थानिक प्रश्न आणि युतीचे अंतिम स्वरूप यावर सखोल चर्चा होणार असून, राज-उद्धव ठाकरे यांच्याकडे नेमकी किती जागांची मागणी केली जाणार, याकडे मुंबईच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. एक-दोन दिवसांत यासंदर्भातील अंतिम निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे.

आणखी वाचा 

Manikrao Kokate resigns: माणिकराव कोकाटेंचा राजीनामा, अजितदादा कोणत्या मंत्र्याला कॅबिनेटमध्ये घेणार, धनंजय मुंडेंसह 'हे' सहाजण मंत्रि‍पदाच्या शर्यतीत