मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने 31 मे रोजी प्रभागांच्या आरक्षणाची सोडत काढण्याचे आदेश मुंबई महानगरपालिकेला दिले होते. त्यानुसार प्रभागांच्या आरक्षणाची सोडतही येत्या 31 मे रोजी निघणार आहे. यानंतर याबाबत सूचना आणि हरकती नोंदविण्यासाठीची सुविधा मुंबईतील 24 प्रभागांमध्ये उपलब्ध करण्यात येणार आहे. त्यामुळे निवडणुकीचा धुमधडाका आता काहीच दिवसात सुरु होणार आहे.


महापालिकेत आरक्षण कसे असण्याची शक्यता


मुंबई महापालिकेत प्रभाग आरक्षण पुढीलप्रमाणे असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.



  • पालिका निवडणुकीत ओबीसी आरक्षणाचे 61 प्रभाग हे खुले प्रभाग होण्याची शक्यता आहे.

  • 236 पैकी 118 प्रभाग हे महिलांसाठी असण्याची शक्यता आहे.

  • अनुसूचित जातींसाठी 15 प्रभाग आरक्षित असण्याची शक्यता आहे. त्यापैकी 8 प्रभाग महिलांसाठी राखीव असू शकतात आहे.

  • तर अनुसूचित जमातीसाठी 2 प्रभाग आरक्षित आहेत. त्यापैकी एक प्रभाग महिला आरक्षित आहे.

  • तसेच 219 प्रभाग खुल्या वर्गासाठी ठेवण्यात येणार आहेत त्या पैकी 109 प्रभाग महिलांसाठी आरक्षित असण्याची शक्यता आहे.

  • 31 मे रोजी आरक्षण सोडत होणार आहे. आरक्षण सोडतीवर 1 ते 6 जून पर्यंत हरकती, सूचना स्वीकारण्यात येतील 

  • 13 जून रोजी अंतिम आरक्षण सोडत राजपत्रात प्रसिद्ध केली जाईल 


पालिकेच्या निवडणुक प्रक्रियेला सुरुवात
येत्या 31 मे रोजी वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात ही सोडत काढण्यात येणार आहे. सोडत प्रक्रियेवर सूचना आणि हरकतींसाठी येत्या 6 जूनपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुक प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने 4 मे रोजी दिलेल्या आदेशानुसार निवडणूक आयोगाला दोन आठवड्यात महानगरपालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम आखण्याचे आदेश दिले होते. 


साधारण निवडणूका कधी लागतील?
आरक्षण सोडतीची प्रक्रिया, मतदार यादी तयार करणे, त्यावर हरकती आणि सूचना नोंदविणे. मतदार यादीत सुधारून करणे, तक्रारींचे निरसन करणे आदी प्रक्रियाही पूर्ण कराव्या लागणार आहेत या सर्व प्रक्रियेला किमान 2 महिन्याचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. येत्या सप्टेंबरमध्ये निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार असून ऑक्टोबरमध्ये निवडणूकीचा धुमधडाका सुरू होणार आहे.


सर्वच पक्ष लागले कामाला; वॉर्डात वॉर्डात भेटीगाठी वाढल्या
आरक्षण सोडत लवकरच जाहीर होणार आहे त्यामुळे प्रत्येक पक्षातील इच्छुकांनी आता बोर्ड वार्डात मोर्चेबांधणी सुरू केली आहे. तसेच आरक्षण सोडतीत काही बदल झाल्यास , त्यावर पर्यायही पक्षांतर्गत उभे करण्यासाठी चाचपणी जोरदार सुरु आहे. प्रत्येक इच्छुकांचे लक्ष हे आरक्षण सोडततीवर लागलेले आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवार आपल्या वार्डसह शेजारील वॉर्डात भेटीगाठी घेत आहेत. शिवसेना , मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर सर्वच पक्षातील संभाव्य उमेदवार, जोरदार तयारी आगामी निवडणुकांसाठी करताना मुंबईत पाहायला मिळत आहे.