UP Election Result 2022 : देशातील पाच राज्यातील निवडणूकांचे बहुतांश निकाल समोर आले असून पंजाब वगळता इतर चारही राज्यात भाजपने सर्वाधिक जागांवर विजय मिळवला आहे. त्यात देशाच्या राजकारणात महत्त्वाचं राज्य असणाऱ्या उत्तरप्रदेशमध्ये पुन्हा एकदा योगींची जादू दिसली असून भाजपने यंदाही उपीमध्ये सरकार स्थापन करण्याच्या दिशेने यशस्वी पाऊल टाकलं आहे. दरम्यान भाजपच्या या विजयाचे पडसाद देशभरात उमटत असून महाराष्ट्रातही भाजप कार्यकर्ते जल्लोष करत आहेत. 


भाजपच्या विजयाचा जल्लोष देशभरात साजरा होत असताना लातूर येथील भाजपच्या कार्यकर्त्यांनी देखील हा विजय साजरा केला आहे. पण यावेळी तेथील एका भाजप कार्यकर्त्याने योगी आदित्यनाथ यांच्या सारखी वेशभूषा करत थेट बुलडोझरमधून रॅली काढली. त्यामुळे लातूरमध्ये थेट बुल्डोझर बाबा समोर आल्याचं दिसून आलं. या उत्साही कार्यकर्त्याचं नाव पुजारी पांडे असं असून तो शहरभर कार्यकर्त्यांसह बुल्डोझरमध्ये उभा राहुन विजयी रॅली काढत आहे. यावेळी भाजप कार्यकर्त्ये जोरदार घोषणाबाजी देखील करत असून फटाके फोडण्यात येत आहेत. शहरातील गंज गोलाई, हनुमान चौक यासह मुख्य भागात एकत्र येत कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आहे. 


आतापर्यंत उत्तरप्रदेश निवडणूक निकाल 


पाचही राज्यांपैकी सर्वात मोठी लढाई उत्तर प्रदेशची होती. जी भाजपनं जिंकलेली आहे. उत्तर प्रदेशच्या जनतेनं भाजपला स्पष्ट बहुमत दिले आहे. भाजप 265 जागी आघाडीवर तर समाजवादी पक्षाला 133 जागांवर समाधान मानावं लागलंय.  तिकडे बसपा तिसऱ्या स्थानी तर  काँग्रेस  चौथ्या स्थानी पोहोचलं आहे.


2017 सालीही भाजपला बहुमत


उत्तर प्रदेशमध्ये 2017 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला 317 जागा, समाजवादी पक्षाला 47 जागा, बसपाला 19 जागा तर काँग्रेसला केवळ सात जागा मिळाल्या होत्या.


हे ही वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha