मुंबई : भाजपने नगरपालिकेप्रमाणेच महापालिका (KDMC) निवडणुकीत विजयी सलामी दिली असून भाजपचे राज्यभरातून 6 उमेदवार विजयी झाले आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष असलेल्या कल्याण-डोंबिवली महापालिकेतून भाजपच्या विजयाचा श्रीगणेशा झाला. कल्याण-डोंबिविलीत भाजपचे (BJP) तीन उमेदवार विजयी झाले असून तिन्ही उमेदवार महिला आहेत. त्यामुळे, भाजपच्या विजयाचे खाते महिलांनी खोलले. तर, कल्याण-डोंबिवलीनंतर धुळे महापालिकेत 2 आणि पनवेल महापालिकेत 1 असे एकूण 6 उमेदवार बिनविरोध झाले आहेत. त्यामुळे, उमेदवारी अर्ज भरल्याच्या दुसऱ्याच दिवशी भाजपने विजयाचा षटकार ठोकला आहे, असे म्हटलं तर वावगं ठरणार नाही. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात कल्याण डोंबिवलीतील 3 प्रभागात 3 महिला उमेदवार बिनविरोध ठरल्या आहेत. 

Continues below advertisement

केडीएमसीतील प्रभाग क्र. 18 मधून रेखाताई चौधरी आणि प्रभाग क्र.26-क मधून आसावरीताई केदार नवरे यांची नगरसेविकपदी बिनविरोध निवड झाली. या विजयानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण (Ravindra chavan) यांनी दोन्हीही विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले. त्यानंतर, प्रभाग क्रमांक 26 ब मधून भाजपच्या रंजना मीतेश पेणकर बिनविरोध निवडून आल्या आहेत. त्यामुळे, भाजपने येथील महापालिकेत विजयाची हॅट्रिक केली.

धुळे महापालिकेत 2 बिनविरोध

महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 1 अ च्या भाजपाच्या उमेदवार उज्वला भोसले बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. प्रति स्पर्धी समोरच्या उमेदवारांचे अर्ज छाननी प्रक्रियेत  बाद झाला आहे. प्रभाग क्रमांक 1 अ मधून एकमेव भाजपच्या उज्ज्वला रणजितराजे भोसले यांचा उमेदवारी अर्ज वैध झाला आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष रणजीत भोसले यांच्या त्या पत्नी आहे. विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी शरद पवार पक्षातून भाजपात प्रवेश केला होता. त्यामुळे, एकाच दिवसात नगरसेवक होण्याची संधी त्यांना मिळाली. धुळे महापालिकेत भाजपच्या आणखी एक महिला उमेदवार बिनविरोध आल्या आहेत. प्रभाग क्रमांक सहा ब मधून भाजपच्या ज्योत्स्ना प्रफुल पाटील बिनविरोध निवड झाल्या आहेत. त्यांच्याविरोधात उमेदवारी अर्ज नसल्याने ज्योत्स्ना पाटील यांचीही बिनविरोध निवड होईल. त्यामुळे, धुळे महापालिकेतही भाजपचे 2 उमेदवार जिंकले आहेत. 

Continues below advertisement

पनवेलमध्ये एक उमेदवार विजयी

पनवेल महापालिका निवडणुकीमध्ये भाजपचा उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे. येथील प्रभाग 18 मधून शेकापच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाल्याने प्रभाग क्रमांक 18 मधून भाजप उमेदवार नितीन पाटील बिनविरोध निवडून आले आहेत. शेकाप महाविकास आघाडीचे उमेदवार रोहन गावंड यांचा अर्ज छाननी प्रक्रियेत बाद झाल्याने नितीन पाटील विजयी झाले आहेत. 

हेही वाचा

नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट