Nagpur Municipal Corporation Election: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं होम ग्राऊंड असलेल्या नागपूरमध्ये भाजपकडून इच्छुकांची संख्या मोठी आहे. नागपूर महापालिकेच्या 151 जागांसाठी भाजपने तब्बल 300 कार्यकर्त्यांना उमेदवारी अर्ज व आवश्यक कागदपत्रे तयार ठेवण्याचे निर्देश दिले होते. अनेक प्रभागांमध्ये एकापेक्षा अधिक दावेदार असल्याने अंतिम निर्णय घेण्यास पक्षश्रेष्ठींना अडचणी येत असल्याचं स्पष्ट होत आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातील काही प्रभागांमध्येही गोंधळाची स्थिती निर्माण झाल्याची चर्चा आहे. दरम्यान, आता भाजपने नागपूर महानगरपालिका निवडणुकीत उमेदवारांना एबी फॉर्म वाटप करण्यास सुरुवात केली आहे. उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर न करता थेट एबी फॉर्म देऊन उमेदवारी निश्चित करण्याचा मार्ग भाजपने अवलंबला आहे. याच प्रक्रियेत प्रभाग क्रमांक 36 मधून नागपुरातील युवा चेहरा शिवाणी दाणी यांना भाजपची उमेदवारी देण्यात आली आहे. शिवाणी दाणी यांना एबी फॉर्मचे वितरणही करण्यात आले आहेत. 

Continues below advertisement

महाविकास आघाडी एकत्र लढण्यावर एकमत 

युतीतील मित्रपक्ष असलेल्या शिंदे गटाच्या शिवसेनेसाठी भाजपकडून 8 ते 10 जागा सोडल्या जाण्याची शक्यता असून उर्वरित सुमारे 140 जागांवर भाजप स्वतः निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे. दुसरीकडे, नागपूरमध्ये महाविकास आघाडी एकत्र लढण्यावर जवळपास एकमत झाल्याची माहिती आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेस 129, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) 12 आणि ठाकरे गटाच्या शिवसेनेला 10 जागा, असा जागावाटपाचा प्राथमिक फॉर्म्युला ठरल्याचं सांगितलं जात आहे. तर भाजपकडून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला युतीसाठी विचारणा न झाल्याने अजित पवार गटाची वंचित बहुजन आघाडीसोबत चर्चा सुरू असल्याची माहिती आहे.  दरम्यान, राज्यातील महापालिका निवडणुकांसाठी आज आणि उद्या उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत असल्याने इच्छुक उमेदवार व कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. उमेदवारीसाठी प्रचंड स्पर्धा असल्याने राजकीय पक्षांनी यावेळी पारंपरिक पद्धतीने उमेदवारांची यादी जाहीर न करता थेट एबी फॉर्म वाटपाची रणनीती स्वीकारल्याचं चित्र आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

Continues below advertisement