Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : ईव्हीएम विरोधात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आवाज बुलंद करत आज मारकडवाडीला भेट देणार आहे. मात्र, साकोली मतदारसंघातून (Sakoli Vidhan Sabha Election Result 2024) नाना पटोले यांच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या भाजप उमेदवार अविनाश ब्राह्मणकर यांनी मात्र नाना पटोले यांना वेगळे चॅलेंज दिले आहे.

Continues below advertisement

नाना पटोले यांनी साकोली मतदारसंघातून राजीनामा देऊन मत पत्रिकेवरील निवडणुकीत पुन्हा उतरावं. ईव्हीएम नंतर त्यांचा मतपत्रिकेवरही किमान 5000 मतांनी पराभव करून दाखवू, असं अविनाश ब्राह्मणकर यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटले आहे.

भावी मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट करणाऱ्यांचा फक्त 208 मतांनी निसटता विजय

नाना पटोले यांना असं वाटतंय की ईव्हीएम मुळे त्यांचा फक्त निसटता विजय होऊ शकला आहे. अन्यथा ते मोठ्या मताधिक्याने जिंकले असते. तर त्यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन मतदान पत्रिकेवरील निवडणूक लढवून दाखवावी, असे अविनाश ब्राह्मणकर म्हणाले. मुळात नाना पटोले काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असताना आणि त्यांनी स्वतःला भावी मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट केलं असताना ही त्यांचा फक्त 208 मतांनी निसटता विजय झाला. आणि तोच त्यांच्या जिव्हारी लागल्यामुळे ते ईव्हीएम विरोधात नाहक ओरड करत असल्याचा आरोपही ब्राह्मणकर यांनी केला आहे. 

Continues below advertisement

पराभव लपवण्यासाठी ईव्हीएमला दोष

ईव्हीएम विरोधात खोटे आरोप करणाऱ्या नाना पटोले यांनी लक्षात ठेवावं की ईव्हीएमच्या  मतांमध्ये मागे राहून ते टपाली मतांच्या जोरावर जिंकले आहे. एका प्रकारे जनतेच्या मतदानात त्यांचा पराभव झाला आहे. आणि आपला तोच पराभव लपवण्यासाठी, आपली प्रतिमा जपण्यासाठी नाना पटोले ईव्हीएमला दोष देऊन आपल्या पराभवावर पांघरून टाकण्याचा केविलवाणा प्रयत्न नाना पटोले करत असल्याचे अविनाश ब्राह्मणकर म्हणाले.

मारकडवाडी गावात आज महाविकास आघाडी विरुद्ध महायुती

शरद पवार यांच्या सभेनंतर आज भाजपकडून महाविकास आघाडीच्या फेक नरेटीव विरुद्ध जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. भाजपकडूनही मारकडवाडी गावात जोरदार तयारी करण्यात आली आहे . आज आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांच्यासह राम सातपुते यांची ही जाहीर सभा थोड्या वेळात होत असून गावातील तणावाची परिस्थिती पाहता मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आणि राज्य राखीव पोलीस दलाचे जवान तैनात करण्यात आलेले आहे.

या छोट्याशा गावात सध्या शरद पवार गट आणि भाजपची मोठी बॅनरबाजी करण्यात आली असून आज भाजपच्या सभेनंतर दुपारी तीन वाजता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हेही गावात पोहोचणार आहेत. त्यामुळे आज महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्हीचे नेते येणार असल्याने दोन्ही गटाची लोक आपले शक्ती प्रदर्शन करण्याच्या तयारीत आहेत. 

हे ही वाचा