बीड : बीड जिल्ह्यातील ऊस तोडणी कामगार महिलांचे गर्भाशय काढण्याचे प्रमाण अधिक असल्याचे यापूर्वीच समोर आले आहे. त्यावर प्रतिबंध व्हावा म्हणून 17 मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यात आली आहे. त्यानुसार यापुढे 35 वर्ष वयाच्या आतील महिलांचे गर्भाशयाची शस्त्रक्रिया करायची असल्यास त्यासाठी मेडिकल ऑडिट करणे बंधनकारक करण्यात आलं आहे.

आरोग्य प्रशासनाकडून बीड जिल्ह्यातील ऊस तोडणी कामगार महिलांच्या तपासणीनंतर या महिला कामगारांचे गर्भाशय काढण्याचे प्रमाण अधिक आणि धोक्याचे असल्याचे लक्षात आले होते त्यावरुन आरोग्य विभागाने आता सक्त पावलं टाकायला सुरुवात केली आहे.

बीड जिल्ह्यातील एकूण 85 हजार महिलांची माहिती गोळा करण्यात आली होती. त्यापैकी 13 हजार महिलांचे गर्भाशयाच्या शस्त्रक्रिया झाल्याचे एका अहवालातून समोर आले होते. त्यानंतर आरोग्य विभागाने आता काही मार्गदर्शक तत्वे घालून दिले आहेत जी पाळणं वैद्यकीय अधिकार्‍यांना बंधनकारक असणार आहेत.

त्यासंदर्भात अतिरिक्त आरोग्य संचालक अर्चना पाटील यांनी ही मार्गदर्शक तत्त्वे तयार करुन आरोग्य विभागाला पाठवले आहेत. सध्या हा निर्णय बीड पुरता मर्यादित आहे. भविष्यात याच मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी संपूर्ण राज्यासाठी करण्यात येणार आहे. विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांच्या समितीनेसुद्धा महिलांच्या गर्भाशय शस्त्रक्रिया संदर्भामध्ये चौकशी केली होती. यातून आरोग्य विभागाला यासंदर्भात अहवाल सादर केला होता.

बीड जिल्हा आरोग्य विभागाने नुकतेच जिल्ह्यातील सर्व तालुका आरोग्य अधिकारी आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांना या संदर्भामध्ये लेखी आदेश दिले आहेत यानुसार जिल्ह्यातील प्रत्येक खाजगी रुग्णालयांना गर्भाशय काढण्यासाठी परवानगी घेणे बंधनकारक असेल. ती माहिती दर महिन्याला जिल्हा शल्यचिकित्सकाकडे आकडे सादर करावी लागणार आहे. विशेष म्हणजे यापुढे ऊस तोडणी महिलांची ऊस तोडीला जाण्यापूर्वी आणि परतल्यानंतर आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.