मुंबई: विधानसभा निवडणुका ऐन तोंडावर आल्या असताना भाजपात येणारे 'आयाराम' विरूद्ध निष्ठावंत यांच्यातला संघर्ष  मुंबईमध्ये आता उघडपणे समोर आला आहे. पक्षाचे मुंबई प्रदेश अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांच्यासमोरच भाजप पश्चिम महाराष्ट्र आघाडीच्या कार्यकर्त्यांनी विविध पदांवरील नियुक्त्यांवरून निदर्शनं करत आक्षेप व्यक्त केला. यावेळी लोढा आणि निदर्शकांमध्ये शाब्दिक खटकेही उडाले.


भाजपची पश्चिम महाराष्ट्र आघाडी ही प. महाराष्ट्रातील जिल्ह्यांमधून मुंबईत स्थायिक झालेल्या लोकांशी संपर्क आणि पक्ष प्रचारासाठी स्थापन केलेली आघाडी आहे. दोनच महिन्यांपूर्वी मुंबई प्रदेशाध्यक्ष झालेल्या मंगलप्रभात लोढा यांनी या आघाडीच्या अध्यक्षपदी मर्जीतल्या माणसाची नियुक्ती केल्याचा आरोप पक्षाच्या प. महाराष्ट्र आघाडीचे विद्यमान प्रमुख वसंतराव जाधव यांनी केलाय. एकीकडे हे निवडणुकीचं वर्ष असताना कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता नियुक्त्या होणं योग्य नाही. नव्या लोकांचं पक्षात स्वागत आहे मात्र त्यापायी निष्ठावंतांवर अन्याय नको, अशी भावना जाधव यांनी व्यक्त केली.



सध्या भाजपमध्ये राज्यभरातून काँग्रेस-राष्ट्रवादीचे महत्वाचे नेते प्रवेश करतायत. विरोधी पक्षातून येणाऱ्यांची ही संख्या पाहून माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी, "आम्हाला बाहेर जावं लागेल" अशी मिश्किल टिपण्णीही केली होती. काही ठिकाणी शिवसेनेचे लोकसभा-विधानसभेचे हक्काचे मतदारसंघ असलेल्या ठिकाणीही भाजपनं इनकमिंग करून घेतल्यानं शिवसेनेतही अस्वस्थता आहे. दुसरीकडे, आज जरी भाजपमधल्या इनकमिंगचं पक्षात स्वागत होत असलं तरी त्यांचं पुनर्वसन हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासमोरचा मोठा प्रश्न असणार आहे.


कार्यकर्त्यांच्या या उद्रेकानंतर लोढा यांनी त्यांना नियुक्त्यांबद्दल पुनर्विचार करण्याचे आश्वासन दिले. मात्र, एकीकडे पश्चिम महाराष्ट्रातील दिग्गज नेते भाजपत दाखल होत असताना भाजपच्या पश्चिम महाराष्ट्र आघाडीनेच फडकवलेले हे बंडाचे निशाण पक्षात सारंच काही आलबेल नाही याचेच संकेत देत आहे.