मित्रपक्षांना भाजपच्या चिन्हावर विधानसभा निवडणूक लढण्याची मुख्यमंत्र्यांची ऑफर, सूत्रांची माहिती
एबीपी माझा वेब टीम | 10 Sep 2019 05:20 PM (IST)
विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेनेसोबत युतीमध्ये रासप, रिंपाई आणि शिवसंग्राम या घटकपक्षांना काही जागा सोडण्यात येणार आहेत. या जागांवर मित्रपक्षांनी भाजपच्या चिन्हावर लढण्याची ऑफर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मित्रपक्षांना दिल्याचं बोललं जात आहे.
मुंबई : विधानसभा निवडणुकीचे बिगुल येत्या काही दिवसांत वाजण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकारणात विविध घडामोडींना वेग आलेला दिसत आहे. विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना युती होणार असल्याचं पक्षाच्या नेत्यांकडून यापूर्वीच सांगण्यात आलं आहे. या युतीमध्ये मित्रपक्षांसाठी मात्र भाजपकडून कमळाच्या चिन्हावर लढण्याची ऑफर देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेनेसोबत युतीमध्ये रासप, रिंपाई आणि शिवसंग्राम या घटकपक्षांना काही जागा सोडण्यात येणार आहेत. या जागांवर मित्रपक्षांनी भाजपच्या चिन्हावर लढण्याची ऑफर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मित्रपक्षांना दिल्याचं बोललं जात आहे. मात्र भाजपच्या या ऑफरला रासपचे महादेव जानकर आणि रिपाइंच्या रामदास आठवले यांनी नकार दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजपच्या चिन्हावर विधानसभा निवडणूक लढवली तर आपल्या पक्षाचं राष्ट्रीय अस्तित्व धोक्यात येईल, असं जानकरांनी सांगितलं आहे. दरम्यान, महायुतीमध्ये घटक पक्षांना 288 पैकी 18 जागा मिळणार असल्याची माहिती महादेव जानकर यांनी दिली आहे. शिवाय घटक पक्षांना देण्यात येणाऱ्या या 18 जागांपैकी 12 जागा राष्ट्रीय समाज पक्षाला मिळणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. महायुतीत घटक पक्षांना 18 जागा मिळणार?