जळगाव : जळगाव लोकसभा मतदार संघाची उमेदवारी कापल्याने नाराज असलेल्या भाजपच्या आमदार स्मिता वाघ यांची आज राष्ट्रवादीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. देवकर यांनी निवडणुकीत वाघ कुटुंबाने आपल्याला सहकार्य करावे अशी विनंती केल्याची सूत्रांनी माहिती आहे.

यावेळी स्मिता वाघ त्यांचे पती उदय वाघ आणि राष्ट्रवादीचे उमेदवार देवकर यांच्यात बराच वेळ चर्चा झाली. देवकर आणि वाघ यांच्यातील आज झालेल्या भेटीने जिल्ह्यात विविध तर्कवितर्क आता लढविले जात आहेत.

जळगावात भाजपने उमेदवार बदलला, स्मिता वाघ यांचा पत्ता कट, उन्मेष पाटलांचा उमेदवारी अर्ज
जळगावात भाजपनं स्मिता वाघ यांना उमेदवारी घोषित केली होती. मात्र वाढता विरोध पाहून स्मिता वाघ यांचा पत्ता कट करत भाजपनं चाळीसगावचे विद्यमान आमदार उन्मेष पाटील यांना उमेदवारी दिली आहे.  एबी फॉर्म मिळाल्यानंतर उन्मेष पाटील यांनी भाजपकडून अर्ज दाखल केला. विशेष म्हणजे पाटील अर्ज भरताना स्मिता वाघही उपस्थित होत्या.

भाजपमधील गटबाजी आणि पराभवाच्या भीतीने भाजपनं स्मिता वाघ यांच्यायऐवजी उन्मेश पाटील यांना उमेदवारी दिल्याचं बोललं जातं आहे. जळगावातील विद्यमान खासदार ए. टी. पाटील यांना भाजपने तिकीट नाकारल्यामुळे ते नाराज आहेत. दुसरीकडे आघाडीने गुलाबराव पाटलांना उमेदवारी दिल्याने त्यांचं पारड जड झाल्याची चर्चा मतदारसंघात होती. त्यामुळे उन्मेष पाटील यांच्यावर पक्षाने विश्वास दाखवला.