UP Election 2022 : उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीला 10 फेब्रुवारीपासून सुरूवात होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपने आज पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah), उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्यासह अनेक नेत्यांच्या उपस्थितीत 'लोक कल्याण ठराव पत्र'  या शिर्षकाखाली जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला.


भाजपच्या जाहीरनाम्यात, सर्व शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोफत वीज देण्याचे आश्वासन देण्यात आलं आहे. याबरोबरच पाच हजार कोटींची कृषी सिंचन योजना सुरू होणार, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 14 दिवसांत पैसे दिले जाणार, विलंब झाल्यास त्या रक्कमेवर व्याज दिले जाईल, राज्यातील प्रत्येक विधवा आणि निराधार महिलेला दर महिन्याला 1 हजार 500 रुपये पेन्शन मिळेल, सहा मेगा फूड पार्क उभारण्यात येणार आहेत तर पाच हजार कोटींच्या गुंतवणुकीसह सरदार पटेल कृषी-पायाभूत सुविधा अभियान राबवण्यात येणार असल्याची घोषणा जाहीरनाम्यात करण्यात आली आहे. 


प्राथमिक शाळांमध्ये टेबल बेंचची व्यवस्था करणार, प्रत्येक मंडळात किमान एक विद्यापीठ, राज्यातील प्रत्येक कुटुंबाला किमान एक रोजगार देणार. रुग्णवाहिका आणि एमबीबीएसच्या जागा दुप्पट करणार. लव्ह जिहाद थांबवण्यासाठी 10 वर्षे तुरुंगवास आणि 1 लाख दंडाची तरतूद. अन्नपूर्णा कॅन्टीन बनवून गरीबांना स्वस्त धान्य देणार, असे आश्वासन भाजपच्या जाहीरनाम्यातून देण्यात आले आहे.   


MSP वर भाजपने आश्वासन 
उत्तर प्रदेशमध्ये भाजपचे सरकार आले तर पुढील पाच वर्षांत सरकार किमान आधारभूत किमतीवर (MSP) गहू आणि इतर धान्याची खरेदी आणखी मजबूत करेल. पुढील पाच वर्षात 1 हजार कोटी खर्च करून राज्याला दूध उत्पादनात आघाडीवर ठेवणार. यासाठी गावागावात सहकारी संस्था स्थापन करून दूध उत्पादकांना त्यांचे दूध गावातच माफक दरात विकण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल.   


शेतकऱ्यांना सौरपंप मिळणार 
पंतप्रधान कुसुम योजनेंतर्गत शेतकऱ्यांना सोलर पंप देणार. तसेच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सौरऊर्जेपासून निर्माण होणारी अतिरिक्त वीज विकण्याची योग्य व्यवस्था केली जाईल.


भाजपने आपल्या जाहीरनाम्यात म्हटले आहे की, अवंतीबाई लोधी सेल्फ हेल्प ग्रुप (SHG) मिशन अंतर्गत पाच हजार कोटी रूपये खर्च करून पाच लाख नवीन महिला बचत गट तयार केले जातील. बचत गटांमध्ये काम करणाऱ्या सुमारे 1 कोटी महिलांना कमी दरात क्रेडिट कार्डद्वारे एक लाखांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून दिले जाईल.


जाहीरनामा प्रसिद्ध केल्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, 'भाजप येत्या 5 वर्षांत लोकांचे जीवन बदलण्यासाठी जाहीरनामा प्रसिद्ध करत आहे. पाच वर्षापूर्वीही भाजपने याच सभागृहात आपला जाहीरनामा सादर केला होता. उत्तर प्रदेशमध्ये कायद्याचे राज्य असून राज्यातील प्रत्येक मुलगी सुरक्षित आहे. 2017 च्या आधी राज्यात 700 दंगली झाल्या होत्या. उत्तर प्रदेशात आज संचार बंदी लागत नाही तर कावड यात्रा निघते. राज्यभरात सण-उत्सव आनंदात साजरे होत आहेत. 86 लाख शेतकऱ्यांना 36 हजार कोटी रूपयांचे कर्ज माफ करण्यात आले आहे. पाच लाख तरूणांना रोजगार मिळाला आहे. "


 उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचार आज सांयकाळी संपणार आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील 11 जिल्ह्यांतील शामली, मेरठ, मुझफ्फरनगर, बागपत, हापूर, गौतम बुद्ध नगर, गाझियाबाद, बुलंदशहर, मथुरा, आग्रा आणि अलीगढमधील 58 जागांसाठी 10 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. उत्तर प्रदेशमध्ये 10, 14, 20, 23, 27  फेब्रुवारीसह 3 आणि 7 मार्च रोजी सात टप्प्यांत मतदान होणार आहे. तर 10 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे.


उत्तर प्रदेश हे देशातील मोठे आणि महत्वपूर्ण राज्य आहे. उत्तर प्रदेशच्या निकालावरच देशभरातील राजकारणाची पुढील दिशा ठरत असते. त्यामुळे सर्वच पक्ष या राज्यात सत्ता आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यासाठी जोरदार हालचाली सुरू आहेत. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत. 


उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ की अखिलेश यादव?  


उत्तर प्रदेशची सत्ता योगी आदित्यनाथ यांच्याकडे जाणार की अखिलेश यादव यांच्याकडे जाणार हे येत्या महिन्याभरात स्पष्ट होणार आहे. असं असलं तरी उत्तर प्रदेशच्या एबीपी न्यूजच्या सी वोटर सर्व्हेमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळणार असल्याचं दिसतंय. तर योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्री म्हणून सर्वाधिक लोकांनी पसंती दर्शवली आहे. त्यानंतर अखिलेश यादव यांच्या नावाला पसंती दिली आहे. 


एबीपी न्यूजने केलेल्या सी व्होटर सर्व्हेमध्ये योगी आदित्यनाथ यांच्या नावाला सर्वाधिक म्हणजे 43.6 टक्के लोकांनी पसंती दिली आहे तर अखिलेश यादव यांच्या नावाला 33.7 टक्के लोकांना पसंती दिली आहे. तिसऱ्या क्रमांकावर बसपच्या मायावती असून त्यांच्या नावाला 15.6 टक्के लोकांना पसंती दिली आहे. प्रियंका गांधी यांना मुख्यमंत्री म्हणून केवळ 4.4 टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे. 


महत्वाच्या बातम्या


UP Election: योगी आदित्यनाथ की अखिलेश यादव? उत्तर प्रदेशच्या सत्तेचा मुकुट कुणाच्या डोक्यावर? जाणून घ्या जनता कौल काय...


UP Election: उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा योगी राज? भाजपा आणि समाजवादी पक्षामध्ये चुरशीची लढत